पीटीआय, उत्तरकाशी
ढिगाऱ्याच्या अखेरच्या १२ मीटर पट्टय़ाचे खोदकाम करणाऱ्या १२ सदस्यांच्या ‘रॅट-होल मायिनग’ पथकाचे फिरोज कुरेशी आणि मोनू कुमार हे दोघे सर्वात आधी अडकलेल्या ४१ मजुरांना भेटले. ढिगाऱ्याचा अखेरचा अडथळा हटवल्यानंतर हे दोघे बोगद्यामध्ये उतरले. त्या वेळी मजुरांनी हर्षभराने आपले स्वागत केल्याचे कुरेशी आणि कुमार यांनी सांगितले.
दिल्लीच्या खजुरी खासचे रहिवासी असलेल्या फिरोज कुरेशी यांनी सांगितले की, ‘‘आम्ही ढिगाऱ्याच्या अखेरचा भाग दूर करत असताना त्यांना आमचे आवाज ऐकू जात होते. आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी आमचे आभार मानले आणि मला मिठी मारली. त्यांनी मला खांद्यावरही उचलून घेतले. मला त्यांच्यापेक्षाही जास्त आनंद झाला होता.’’
हेही वाचा >>>नागरिकत्व दुरुस्ती कायदा कोणीही थांबवू शकत नाही; गृहमंत्री अमित शहा यांचा दावा
कुरेशी हे दिल्लीतील रॉकवेल एंटरप्रायजेस या कंपनीचे कर्मचारी असून बोगदा कामातील तज्ज्ञ आहेत. कुरेशी यांच्याबरोबर उत्तर प्रदेशातील बुलंदशहरचे सोनू कुमार हेही होते. कुमार यांनी स्वत:चा अनुभव सांगितला की, ‘‘त्यांनी मला बदाम दिले आणि माझे नाव विचारले. त्यानंतर आमचे बाकीचे सहकारीदेखील तिथे पोहोचले आणि आम्ही तिथे साधारण अर्था तास होतो.’’ त्यांच्यानंतर एनडीआरएफचे कर्मचारी बोगद्यामध्ये पोहोचले. ते आल्यानंतर आम्ही बाहेर पडलो असे कुमार यांनी सांगितले. या ऐतिहासिक कामात सहभागी असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
रॉकवेल एंटरप्रायजेसच्या १२ सदस्यांच्या ‘रॅट-होल मायिनग’ पथकाचे प्रमुख असलेले वकील हसन यांनी सांगितले, की ‘‘कंपनीने चार दिवसांपूर्वी त्यांना बचावकार्यामध्ये सहभागी होण्यास सांगितले. ढिगाऱ्यातून ऑगरचे तुटलेले तुकडे बाहेर काढताना कामाला उशीर झाला. आम्ही सोमवारी दुपारी ३ वाजता कामाला सुरुवात केली आणि मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता काम संपले.’’विशेष म्हणजे बचावकार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या या १२ जणांनी कोणतेही शुल्क आकारले नाही.