देशात गेल्या अनेक दिवसांपासून दोन प्रकरणं मोठया प्रमाणात गाजत आहेत. पहिलं म्हणजे उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांसोबत झालेला हिंसाचार आणि दुसरं मुंबईतील क्रूज पार्टीतील ड्रग्जच्या प्रकरणामुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या वाढत्या अडचणी. दरम्यान, या दोन्ही प्रकरणांवर आणि त्याबाबतच्या कारवाईबाबत अनेक वाद-विवाद, मतमतांतरं दिसून येत असताना आता काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनीही याबाबत एक सवाल उपस्थित केला आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक करताना मोठी तत्परता दाखवली गेली होती. परंतु, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाच्या कारवाईदरम्यान मात्र या तत्परतेचा अभाव दिसला, अशी टीका अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.

भारतीय संविधानात सर्वांसाठी समान न्याय असल्याचं नमूद करून अधीर रंजन चौधरी यांनी एक मागणी केली आहे. “आर्यन खानला दंडनीय गुन्ह्याअंतर्गत कठोर शिक्षा दिली जाऊ नये”, असं चौधरी म्हणाले. “काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला देखील ताब्यात घेऊन तुरुंगात डांबण्यात आलं होतं. आता आर्यन खानवर ही पाळी आली आहे”, असंही अधीर रंजन चौधरी म्हणाले. दरम्यान, एनसीबीने शनिवारी (१० ऑक्टोबर) आर्यन खानच्या चालकाची चौकशी केली. तर आर्यन खानला या प्रकरणी १ ऑक्टोबरला रात्री तब्यात घेतलं गेलं होतं आणि चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्यानंतर आर्यनसह इतर सात जणांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अधीर रंजन चौधरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर निशाणा साधला आहे. “ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करताना दाखवण्यात आलेली तत्परता लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाच्या कारवाईदरम्यान मात्र दिसली नाही. ज्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्राने निर्दोष आंदोलक शेतकऱ्यांना आपल्या वाहनाने अत्यंत क्रूर पद्धतीने चिरडल्याचा आरोप आहे. हे आश्चर्यकारक आहे.” दरम्यान, अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष ऊर्फ मोनूला शनिवारी (९ ऑक्टोबर) सकाळी १०.३० वाजता युपी पोलिसांच्या विशेष चौकशी पथकापुढे हजर करण्यात आलं आणि ११ तासांच्या चौकशीनंतर त्याला आता म्हणजेच या प्रकरणानंतर आणि प्रचंड मोठ्या दबावानंतर अखेर आठवड्याभराने अटक करण्यात आली आहे.