सोमवारपासून फुटबॉल विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. पण कतारच्या शाही कुटुंबाने फुटबॉल स्टेडियममध्ये दारू विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बडवायझर बीअरची हजारो कॅन पुन्हा गोदामात ठेववण्यास सुरुवात झाली आहे.
विशेष म्हणजे बडवायझर बीअर कंपनीला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी प्रायोजकांपैकी (स्पॉन्सरशिप) एक म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तसेच फुटबॉल सामना सुरू असताना मैदानात बीअर विक्री करण्याची मक्तेदारीही याच कंपनीला देण्यात आली होती. असं असताना कतार सरकारने मैदानात दारू विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याचा बडवायझर कंपनीला मोठा फटका बसला आहे. पण ही कंपनी मैदानात अल्कोहोल-विरहित बीअर विकू शकते.
कतारमधील शाही कुटुंबाच्या दबावामुळे मैदानात दारू विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर फुटबॉल चाहत्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून तिकिटाचे पैसे परत देण्याची मागणी करायला सुरुवात केली आहे. कतारने घेतलेल्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात बीअरचा साठा वाया जाण्याची भीती बडवायझर कंपनीला भेडसावत आहे. याबाबतचं वृत्त ‘द सन’ने दिलं आहे.
खरं तर, फुटबॉल विश्वचषकाच्या तोंडावर बडवायझर कंपनीने लाखो लिटर बीअर टँकरने कतार देशात आणले होते. यासाठी लंडन, लंकशायर आणि वेल्समधील बीअर उत्पादन केंद्रातून बीअरचा साठा कतारला पाठवण्यात आला होता. त्यासाठी सुमारे ८ हजार मैलांचा प्रवास करावा लागला. पण फुटबॉलच्या मैदानात दारुबंदीचा निर्णय घेतल्याने लाखो लिटर बीअर वाया जाण्याची शक्यता आहे, याबाबतची भीती बडवायझर कंपनीला भेडसावत आहे.