Turkey Earthquake Video : टर्की देश साखळी भूकंपांमुळे हादरला आहे. टर्कीसह सिरियामध्येही भूकंपाचे धक्के बसले आहे. या भूकंपांमध्ये आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत येथे भूकंपाचे चार धक्के बसले आहेत. असे असतानाच आज पुन्हा एकदा येथे भूकंपाचा पाचवा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ५.४ रिश्टर स्केल असून यामध्ये मोठी वित्तहानी झाली आहे. दोन दिवसांमधील हा पाचवा भूकंप असून आतापर्यंत ५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी सकाळी चौथा भूकंपाचा धक्का

टर्कीमध्ये एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्का बसत आहेत. सोमवारी तीन भूकंपाचे धक्के बसल्यानंतर आज (मंगळवारी) सकाळी पुन्हा एकदा चौथा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल होती. अंकारा प्रांतातील मध्य गोलबासी शहरात हा भूकंप झाला.

सोमवारी दिवसभरात तीन मोठे भूकंप

तत्पूर्वी सोमवारी टर्कीमध्ये ७.८ रिश्टर स्केल, ७.६ रिश्टर स्केल आणि ६.० रिश्टर स्केल असे तीन मोठे भूकंप झाले. या भूकंपांमुळे टर्की आणि सीरियामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली असून अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या घटनेत अनेक नागरिक ढासळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली बदले असून त्यांच्या बचावासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केला जात आहे. या घटनेत १५ हजारपेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, टर्कीचे उप-राष्ट्रपती फुआत ओकते यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ११ हजार ०२२ जणांचा शोध घेण्यात आला असून ७ हजार ८४० जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. तर दुसरीकडे संकटकाळी मदत म्हणून तसेच मानवतेच्या दृष्टीकोनातून भारताकडून टर्की देशाला मदत करण्यात येत आहे. भारतातून तेथे दोन वाचावपथकं पाठवण्यात आली आहेत. या बचाव पथकांसोबत एक डॉक्टरांची टीमदेखील आहे.

Story img Loader