कोहिमा : ‘नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’चे (एनडीपीपी) नेते नेफ्यू रियो यांनी मंगळवारी पाचव्यांदा नागालँडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल ला गणेशन यांनी ७२ वर्षीय रियो यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
‘एनडीपीपी’चे टी. आर. झेलियांग व भाजपचे वाय. पॅटन यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. रियो यांच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्यांनीही शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आपल्या विनोदी शैलीने समाजमाध्यमांवर लोकप्रिय असलेले तेमजेन इम्ना अलॉन्ग व नागालँड विधानसभेवर प्रथमच निवडून आलेल्या दोन महिलांपैकी एक सलहौतुओनुओ क्रूस यांचा समावेश आहे. क्रूस आणि हेकानी जाखलू प्रथमच नागालँड विधानसभा सदस्यपदी निवडून आल्या आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि आसामचे मुख्यमंत्री व ईशान्य लोकशाही आघाडीचे (एनईडीए) निमंत्रक हिमंता बिश्व शर्मा उपस्थित होते. रियो यांच्या मंत्रिमंडळात ‘एनडीपीपी’चे सात आणि भाजपचे पाच मंत्री आहेत. क्रूस आणि पी. बाशंगमोनबा हे फक्त दोन मंत्रिमंडळातील नवीन चेहरे आहेत.