प्रसिद्ध पोलाद उद्योगपती लक्ष्मी एन. मित्तल हे येत्या आठवडय़ात भारतीय वंशाच्या उद्योगपतीशी लंडन उच्च न्यायालयात दोन हात करणार आहेत. तेलासंबंधीच्या करारावरून उद्भवलेल्या वादानंतर हे दोन उद्योगपती न्यायालयात एकमेकांशी लढणार आहेत.
लक्ष्मी मित्तल हे इंग्लंडमधील सर्वात धनाढय़ व्यक्ती आणि आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष आहेत. एका बडय़ा तेलसंबंधी करारात मित्तल यांनी करार मोडल्याचा आरोप त्यांचे जुने मित्र आणि लंडनमधील प्रसिद्ध भारतीय वंशाचे उद्योगपती मोनी वर्मा यांनी केला आहे. वर्मा हे इंग्लंडमधील सर्वात मोठे तांदूळ व्यापारी आहेत. वर्मा यांच्या या आरोपामुळे इंग्लंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
वर्मा यांनी न्यायालयात धाव घेऊन सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे २००६ मध्ये मित्तल यांनी नायजेरियातील नायगर डेल्टा येथील तेलसाठय़ांसदर्भात आपल्याशी एक करार केल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर मित्तल यांच्यातर्फे हा युक्तिवाद फेटाळून लावण्यात आला. यासंदर्भातली सुनावणी आता येत्या मंगळवारी होणार आहे.
दरम्यान, १९९७ पासून एकमेकांचे मित्र राहिलेले दोघेही भारतीय वंशाचे उद्योगपती एकमेकांशी व्यापारउद्दीमविषयी चर्चा करीत असत. मात्र आता त्यांच्यातील वाद चव्हाटय़ावर आल्यामुळे इंग्लंडमध्ये खळबळ उडाली आहे.