रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर अनेक क्षेत्रांत चढऊतार पाहायला मिळत आहेत. युरोपात खाद्यपदार्थ, नैसर्गिक वायुच्या किमती नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत. असे असताना विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिल्याचे दिसत आहे. मागील सहा सत्रांमध्ये विदेशी वित्त संस्थांनी भारतीय शेअर बाजारात तब्बल १ अब्ज कोटी डॉर्लसची गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीचा असाच ओघ आगामी काळातही कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा >>> बाजार तेजी नव्या टप्प्यावर ; सेन्सेक्स ६० हजारांपुढे, निफ्टीची १८ हजारांवर मजल
मनी कंट्रोल या अर्थ तसेच शेअर बाजाराची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार मागील सहा सत्रांमध्ये भारतीय शेअर बाजारात तब्बल १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. यामध्ये २० ते २८ ऑक्टोबर या काळात ९२३ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात करण्यात आली. भारतीय शेअर बाजाराने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार एकट्या ३१ ऑक्टोबर या दिवशी विदेशी संस्थांनी भारतीय शेअर बाजारात ४१७८.६१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ऑक्टोबर महिन्यात भांडवली बाजारात काहीशी अस्थिरता पाहायला मिळाली. मात्र तरीदेखील मागील काही सत्रांमध्ये शेअर बाजारात तेजी नोंदवली गेली. १ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी पडझड पाहायला मिळाली. नंतर मात्र हे दोन्ही निर्देशांक वधारले.
हेही वाचा >>> ‘डिजिटल रुपी’ दाखल ; मंगळवारपासून घाऊक विभागात प्रायोगिक आधारावर वापर
आज (१ नोव्हेंबर) अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्र्हची बैठक होणार आहे. या बैठकीत बँक अधिक आक्रमक व्याजदर वाढीऐवजी अल्पशी दरवाढ करण्याची अपेक्षा गुंतवणूकदार करत आहेत. या आशावादामुळेच स्थानिक बाजारात समभाग खरेदीमध्ये वाढ होत आहे. मागील काही काळामध्ये गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगत होते. मात्र आता हेच परकीय गुंतवणूकदार मागील काही सत्रांपासून भारतात गुंतवणूक करण्यास परतत आहेत, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिटेल रिसर्च प्रमुख दीपक जसानी यांनी सांगितले आहे.