करोनामुळे संपूर्ण जगाचं अर्थचक्र विस्कळीत झालं आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउनसारखा कठोर निर्णय घेतला. मात्र त्याने अर्थचक्रावर परिणाम झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे काही देशांनी निर्बंध शिथिल करत अर्थचक्राला गती देण्यासाठी नियमावली आखली. मात्र नागरिकांना दिलेली सूट आणि नियमांचं उल्लंघन यामुळे करोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरुवात केली. यावर फिजी सरकारनं एक सूचना जारी केली आहे. करोनाची लस न घेतलेल्यांना जॉब देऊ नये, असे आदेश फिजीचे पंतप्रधान फ्रँक बेनीमारामा यांनी दिले आहेत. हा आदेश कठोर वाटत असला तरी, त्यामागे करोनाचा फैलाव होऊ नये, या भावना असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. दुसरीकडे करोनाची लस घेतली नाही तर नोकरी गमवावी लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे देशात प्रत्येकाला करोनाची लस घेणं अनिवार्य आहे. देशात करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्यानंतर पंतप्रधान बेनीमारामा यांनी हे आदेश दिले आहेत.
१५ ऑगस्टपर्यंत करोना लसीचा पहिला डोस न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं जाणार आहे. तर १ नोव्हेंबरपर्यंत करोना लसीचा दुसरा डोस न घेतल्यास त्यांना कामावरून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे खासगी कंपन्यांनाही ताकीद देण्यात आली आहे. लसीकरण गंभीरतेने न घेतल्यास मोठा दंड भरावा लागेल असं सांगितलं आहे. खासगी कर्मचाऱ्यांसाठी डेडलाइन १ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल. त्या कंपन्या बंद करण्याचा इशारा देखील दिला आहे.
“We have been vaccinated so that we can get back to the lives we love and play sports, like rugby, soccer, and netball; worship in our churches, mosques, and temples; and simply be together — in good health and good spirits — with our friends and family,” @FijiPM
#Fiji pic.twitter.com/T2hHZj0ket— Fijian Government (@FijianGovt) July 9, 2021
“लस नाही तर जॉब नाही, करोनापासून बचावासाठी लस एकमात्र उपाय आहे. या आधारावर आम्ही नवी नियमावली आखली आहे. लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना जॉब गमवावा लागेल”, असं फिजीचे पंतप्रधान फ्रँक बेनीमारामा यांनी सांगितलं. गेल्या वर्षी करोनामुळे देशाची अर्थव्यवस्थेत १९ टक्क्यांनी घट झाली होती. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना देशात येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला होता. फिजीमध्ये अर्ध्याहून अधिक रोजगार हा पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे.
फिजी या देशात आतापर्यंत ८ हजार ६६१ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ४५६ जणांना करोनावर मात केली आहे. सध्या देशात ७ हजार १५७ करोनाचे रुग्ण आहेत, ही वर्ल्डोमीटर या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून करोनाच्या डेल्टा व्हेरियंटने देशात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.