पीटीआय, कोलकाता
‘माया दर्पण’, ‘चार अध्याय’ आणि ‘कसबा’ यासारखे सकस कलात्मक चित्रपट देणारे दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे शनिवारी रात्री वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले. कोलकात्यामधील रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती अभिनेत्री मिता वसिष्ठ यांनी दिली. शाहनी यांच्या मागे पत्नी आणि दोन कन्या आहेत.
वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती खालावली होती, त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी रात्री ११च्या सुमाराला त्यांचा मृत्यू झाला असे वसिष्ठ म्हणाल्या. शाहनी यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारताच्या सिंध प्रांतामधील लारकाना येथे झाला होता. फाळणीनंतर शाहनी कुटुंब मुंबईला आले होते. त्यांनी पुण्याच्या ‘फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ येथे चित्रपटाचे शिक्षण घेतले.शाहनी यांनी १९७२मध्ये ‘माया दर्पण’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन कारकिर्दीला सुरुवात केली. ‘तरंग’, ‘खयाल गाथा’, ‘कसबा’, ‘चार अध्याय’, ‘वार वार वारी’ या चित्रपटांनीही समीक्षकांची वाहवा मिळवली होती.
कुमार शाहनी हे बुद्धिमान दिग्दर्शक आणि सुरेख मनाची व्यक्ती होते. तुमचे उत्कृष्ट चित्रपट, तुमचे स्मितहास्य, सौम्य आवाज आमच्याबरोबर राहील. – खालिद महमूद, लेखक-दिग्दर्शक