गीतकार जावेद अख्तर यांची खंत
भारतातील सध्याची प्रसारमाध्यमे आणि चित्रपट क्षेत्र देशातील मोठय़ा संख्येने असलेल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत कमालीचे असंवेदनशील असल्याची खंत ज्येष्ठ गीतकार आणि पटकथाकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केली आहे. भोपाळ येथे गुरुवारी सायंकाळी आयोजित एका कार्यक्रमात भाषण करताना अख्तर यांनी राजकीय क्षेत्रही त्याला अपवाद नसल्याचे म्हटले आहे.
मुंबईच्या चित्रपट उद्योगात ६० च्या दशकाच्या तुलनेत कालानुरूप मोठय़ा प्रमाणात बदल झाले आहेत. ज्या वेळी मी चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकले तेव्हा चित्रपट निर्माते देशातील मोठय़ा संख्येने असलेल्या ग्रामीण लोकांना डोळ्यासमोर ठेवून चित्रपटाची पटकथा लिहिण्यास सांगत असत, कारण छोटय़ा छोटय़ा शहरांमध्ये चित्रपटांना लोकांनी पसंती दिली, तर तो चित्रपट यशस्वी होणार हे त्यांना माहीत होते. मात्र आताच्या निर्मात्यांना छोटय़ा शहरांमध्ये त्यांचा चित्रपट प्रदर्शित झाला नाही तरी त्यांना विशेष चिंता वाटत नाही. सध्या आपण मल्टिप्लेक्सच्या जमान्यात वावरतो. एका तिकिटाची किंमत साधारण ५०० रुपये एवढी आहे. अशा वेळी एक आठवडा जरी मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट चालला तरी आर्थिकदृष्टय़ा यशस्वी झाल्याची भावना चित्रपट निर्मात्यांमध्ये वाढत असून त्यांना देशातील मोठय़ा प्रमाणात लहान शहरांमध्ये विखुरलेल्या लोकसंख्येची चिंता वाटत नसल्याचे मत अख्तर यांनी व्यक्त केले.
पूर्वीच्या चित्रपटांमध्ये नायक हा नोकरी करणारा, शिक्षक, वकील नाही तर रिक्षाचालक असायचा. मात्र आजच्या चित्रपटातील नायक हा अतिशय आलिशान अशा घरांमध्ये वावरतो. त्याने कधीही ग्रामीण भाग अथवा छोटी शहरे पाहिलेली नसतात, असेही त्यांनी सांगितले.
पूर्वीच्या चित्रपटांमध्ये गाण्यावर विशेष मेहनत घेतली जायची. बिमल रॉय, राज कपूर, गुरु दत्त, विजय आनंद आदी चित्रपट निर्माते गाण्यांसाठी विशेष लक्ष देत असत. मात्र आजच्या गाण्यांचा दर्जा कमालीचा घसरला असून ‘सरकायलो खटिया जाडा लगे’ अशी गाणी ऐकायला आणि पाहायला मिळत असल्याचेही अख्तर यांनी सांगितले.
मात्र असे असले तरी देशातील उत्साही तरुण वर्गामुळे आपण अद्यापही आशा सोडलेली नाही, असे मत अख्तर यांनी व्यक्त केले.
आपल्या भाषणादरम्यान जावेद अख्तर यांनी भोपाळमधील आपल्या आठवणींनाही उजाळा दिला.
चित्रपट, प्रसारमाध्यमे सामान्यांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील
भारतातील सध्याची प्रसारमाध्यमे आणि चित्रपट क्षेत्र देशातील मोठय़ा संख्येने असलेल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत कमालीचे असंवेदनशील असल्याची खंत ज्येष्ठ गीतकार आणि पटकथाकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केली आहे. भोपाळ येथे गुरुवारी सायंकाळी आयोजित एका कार्यक्रमात भाषण करताना अख्तर यांनी राजकीय क्षेत्रही त्याला अपवाद नसल्याचे म्हटले आहे.
First published on: 23-02-2013 at 06:30 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Film media very caution on general problems