दिल्लीत डिसेंबरमध्ये घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेवर लवकरच बंगाली भाषेत चित्रपट येत आहे. त्यात फाळके पुरस्कार विजेते सौमित्र चटर्जी व इतर नवोदित कलाकारांचा समावेश असणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण चाळीस दिवसात पूर्ण केले जाणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलन भौमिक यांनी सांगितले की, आमच्या या चित्रपटाचे नाव ‘निर्भया’ असणार आहे व त्यात सामूहिक बलात्काराच्या मूळ घटनेवर फारसा भर न देता त्यानंतर रस्त्यांवर जी निदर्शने झाली त्याचा वेध घेतला जाणार आहे.
दिल्लीत बलात्कार झालेली व बलात्काऱ्यांना प्रतिकार करणारी ती शूर मुलगी आपली बहीण, कन्या किंवा मित्र असू शकते अशी सजग भूमिका ठेवूनच हा चित्रपट तयार केला आहे. या घटनेनंतर अनेक निषेध मेळावे झाले, धरणे आंदोलने झाली पण या निदर्शनांमुळे दररोज वावरणाऱ्या हजारो मुलींच्या जीवनात काय फरक पडणार आहे असा प्रश्न मला पडला आहे.
या चित्रपटाला निर्भया असे नाव का दिले असे विचारले असता भौमिक म्हणाले की, प्रसारमाध्यमांनी तिची ओळख उघड न करण्यासाठी तिला निर्भया हे नाव दिले होते. चित्रपटालाही तेच नाव दिल्याने आपण संपूर्ण जग व भारताला हादरवून टाकणाऱ्या या घटनेच्या संदर्भाकडे लक्ष वेधले आहे. त्याच्या जोडीला दर तीन मिनिटाला देशात घडणाऱ्या बलात्कारांच्या घटनांचाही वेध घेतला आहे. ‘रंग दे बसंती’चित्रपटाने निषेधाच्या मेणबत्ती संप्रदायाचा जो कल होता त्याचे काहीसे समर्थन केले होते त्यावर या चित्रपटात टीका करण्याचा हेतू आहे काय असे विचारले असता ते म्हणाले की, तसे काही नाही रंग दे बसंती हा उत्तम चित्रपट होता त्यामुळे देशातील युवावर्ग ढवळून निघाला. मेणबत्ती निषेध मोर्चानी स्त्रियांविरोधात गुन्हे करणाऱ्यांच्या मानसिकतेत खरेच काही फरक होतो का याचा शोध घेण्याचा प्रयत्न निर्भया चित्रपटातून केला जाणार आहे.
या चित्रपटात सौमित्र यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका साकार केली आहे,सौमित्र यांनी सांगितले की, आजच्या समाजातील हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पण या चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी फार काही सांगणार नाही. भौमिक हे चाळीस दिवसात या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करणार असून सामूहिक बलात्काराच्या घटनेचा विषय निवडून त्याचे व्यावसायिक भांडवल करण्याचा आमचा हेतू नाही. माणूस म्हणून सगळेच या घटनेने हादरून गेले व अस्वस्थ झाले.
चित्रपट निर्माता म्हणून आपण एकाच आकृतीबंधाशी निगडित असलो तरी यावेळी तो पायंडा मोडून चित्रपट करीत आहे. या चित्रपटात सौमित्र यांच्याशिवाय बादशहा मोईत्रा हे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत तर श्रीलेखा मित्रा त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहेत तर राज,आम्रपाली व मेघाली हे नवीन चेहरे यात आहेत. राज हा बलात्कारित मुलीच्या मित्राची भूमिका पार पाडत आहे.