भारतीय राजकारण ढवळून काढणाऱ्या बोफोर्स घोटाळ्यातील मुख्य आरोपी व इटालियन उद्योजक ओट्टावियो क्वात्रोची (७४) यांचे शनिवारी इटलीतील मिलान येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बोफोर्स घोटाळ्याचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दोन वर्षांपूर्वी क्वात्रोची यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले होते.
राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात मार्च, १९८६ मध्ये भारताने इटलीतील बोफोर्स या कंपनीशी ४१० उखळी तोफा खरेदी करण्याचा करार केला. २८५ दशलक्ष डॉलरचा हा व्यवहार होण्यासाठी बोफोर्सने भारतातील प्रतिनिधी क्वात्रोची यांच्या माध्यमातून दिल्लीतील बडय़ा राजकीय नेत्यांना तब्बल ६४ कोटी रुपयांची दलाली वाटल्याचा आरोप या करारानंतर झाला. राजीव गांधी यांचे नावही यात गोवण्यात आले. या आरोपांनी प्रचंड खळबळ उडाली होती. सीबीआयने या प्रकरणात क्वात्रोची यांना प्रमुख आरोपी केले. अटक टाळण्यासाठी क्वात्रोचींनी १९९३ मध्ये इटलीला पलायन केले. त्यांना अटक करण्यासाठी सीबीआयने अनेकदा प्रयत्न केले. २००३ मध्ये मलेशियातून तर २००७ मधून अर्जेटिनातून क्वात्रोचींना ताब्यात घेण्यात अपयश आले. जंगजंग पछाडूनही क्वात्रोचींना अटक करण्यात सीबाीआयला यश आले नाहीच.
भारतीय न्यायालयांत क्वात्रोची यांच्याविरोधातील खटले वर्षांनुवर्षे प्रलंबित राहिले. अखेरीस जानेवारी, २०११ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने क्वात्रोची प्रकरणावरून सीबीआयला फैलावर घेतले. गेल्या २५ वर्षांत या प्रकरणातील तपासात एक इंचही प्रगती झालेली नाही असे सुनावत तपासच बंद करायला सांगितले. सीबीआयनेही क्वात्रोचींवरील सर्व आरोप मागे घेत बोफोर्स तपासावर पूर्णविराम दिला. क्वात्रोची यांच्या निधनाने आता हे प्रकरणच काळाच्या पडद्याआड गेले आहे.
अखेरचा दुवाही निखळला..
सर्व आरोपींची ‘सुटका’
बोफोर्स घोटाळ्यात ज्यांना ज्यांना आरोपी करण्यात आले होते ते सर्व आरोपी आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. क्वात्रोचींआधी बोफोर्स कंपनीचे प्रमुख मार्टिन आर्डबो, त्यांचे प्रतिनिधी विन चढ्ढा, माजी संरक्षण सचिव एस. के. भटनागर यांचा मृत्यू झाला. तर हिंदुजा बंधूंना दिल्ली उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.