लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनातील प्रशासनाच्या निष्काळजी आणि गैरकारभारावर सातत्याने टीका झाल्यानंतर अखेर मंगळवारी निवासी आयुक्तपदी विमला आर या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. सलग तीन महिने हे पद रिक्त असल्याने नवीन महाराष्ट्र सदनाच्या कारभाराकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात होते.

सध्या विमला आर यांच्याकडे समर्ग शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालकपदाची जबाबदारी आहे. त्यांची मंगळवारी राज्याच्या सामान्य प्रशासन मंत्रालयाकडून दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिवपदी नियुक्ती केली गेली. तत्कालीन निवासी आयुक्त रुपिंदर सिंह यांची केंद्रीय गृहमंत्रालयात अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद गेल्या डिसेंबरपासून रिक्त होते. त्यामुळे नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रशासनाची जबाबदारी अतिरिक्त निवासी आयुक्त नीवा जैन यांच्याकडे देण्यात आली होती.

नवीन महाराष्ट्र सदनातील प्रशासकीय कारभारातील त्रुटी, सोयी-सुविधा पुरवण्यात होणारे दुर्लक्ष, भोजनाच्या सुविधेपासून पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेपर्यंत अनेक तक्रारी केल्या जात होत्या. सदनात येणाऱ्या पाहुण्यांना योग्य सुविधा पुरवल्या जात नसल्याच्या तक्रारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दखल घेतली होती. त्यानंतर काही आठवड्यांमध्ये महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तपदी ज्येष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

Story img Loader