निर्भयाला मी वाचवू शकले नाही याचं मला वाईट वाटतं आहे. दुःखही होतं आहे मात्र तिला न्याय मिळाला याचं मला समाधान आहे. इतकंच नाही तर निर्भयाची आई ही मला मिळालेली ओळख अभिमानास्पद आहे अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली आहे. फाशीची प्रक्रिया पूर्ण झाल्या झाल्या मी निर्भयाच्या फोटोसमोर गेले. त्या फोटोला मिठी मारली. आज निर्भया असती तर तिला जशी मिठी मारली असती अगदी तशीच मिठी मी तिच्या फोटोला मारली. तिला वाचवू शकले नाही याचं वाईट वाटतं आहे असंही निर्भयाच्या आईने म्हटलं आहे.
निर्भयाच्या दोषींना आज फासावर लटकवण्यात आलं हे चांगलंच झालं. मात्र न्याय मिळण्यासाठी उशीर लागला त्याबाबत खंत वाटते. यापुढे २० मार्च हा दिवस निर्भया दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. आजच्या दिवशी निर्भयाचाच विजय झालेला नाही तर तिच्यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाचा विजय झाला आहे असंही निर्भयाच्या आईने म्हटलं आहे.
आणखी वाचा- निर्भया बलात्कार प्रकरण : चारही आरोपींना फाशी
निर्भयाला न्याय मिळण्यासाठी उशीर लागला. या प्रकरणात आपल्या कायद्यातील ज्या काही त्रुटी होत्या त्या समोर आल्या. यापुढे बलात्कारातील आरोपींना वेगवेगळी दया याचिका देण्यास संमती मिळू नये अशी विनंती आपण कोर्टाला करणार असल्याचंही निर्भयाच्या आईने म्हटलं आहे. न्याय मिळण्यासाठी विलंब लागला तेव्हा आम्हाला वाटू लागलं होतं की न्यायव्यवस्थेवर विश्वास कसा ठेवायचा? मात्र उशिरा का होईना न्याय मिळाला याचं समाधान वाटतं आहे. यापुढेही जे बलात्कारी नराधम असतील त्यांना अशाच प्रकारे शिक्षा दिली जाईल अशीही अपेक्षा निर्भयाच्या आईने व्यक्त केली.
आणखी वाचा- असा आहे निर्भया प्रकरणाचा घटनाक्रम
निर्भया या जगात नाही ती परतही येणार नाही. मात्र देशातल्या महिला, मुलींसाठींचा संघर्ष सुरुच राहिल असंही निर्भयाच्या आईने म्हटलं आहे.