* अर्थमंत्रालयाच्या अहवालातील माहिती
* गतवर्षी बनावट नोटांचे प्रमाणही वाढले
दहशतवादी कारवायांसाठी अर्थसाह्य़ करण्याची चौदाशेहून अधिक प्रकरणे देशातील गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांनी गतवर्षी उजेडात आणली असून, यातून अशा प्रकारच्या व्यवहारांच्या प्रमाणात ३०० टक्के एवढी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
इंटेलिजन्स ब्युरो, रिचर्स अँड अ‍ॅनालिसिस विंग, तसेच प्राप्तिकर व सीमा शुल्क विभागांच्या गुप्तचर यंत्रणांद्वारे अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक गुप्तचर पथकाकडे सन २०११-१२ मध्ये अशी एक हजार ४४४ प्रकरणे आली.
सन २०१०-११ मध्ये हाच आकडा ४२८ एवढा होता.
संशयास्पद व्यवहारांत वाढ
देशातील संशयास्पद आर्थिक व्यवहारांची माहिती विविध यंत्रणांकडून जमा करणे, त्या माहितीचे विश्लेषण करणे आणि सुरक्षा यंत्रणा तसेच काळे धन, करचुकवेगिरी यांविरोधातील यंत्रणांना ती माहिती देणे हा अर्थमंत्रालयाच्या आर्थिक गुप्तचर पथकाच्या कामाचा एक भाग आहे. सन २०११-१२ मध्ये अशा संशयास्पद व्यवहारांत १०० हून अधिक टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षांत अशी ६९ हजार २२४ प्रकरणे दृष्टोत्पत्तीस आली. २०१०-११ मध्ये हा आकडा २० हजार ६९८ एवढा होता.
बनावट चलनातही वाढ
देशाच्या अर्थव्यवहारातील बनावट चलनाचे प्रमाणही वाढले आहे. २०११-१२ मध्ये आर्थिक गुप्तचर पथकाकडे विविध बँकांकडून अशी तीन लाख २७ हजार ३८२ प्रकरणे आली. २०१०-११ मध्ये त्यांचे प्रमाण दोन लाख ५१ हजार ४४८ एवढे होते.

Story img Loader