विमानाच्या इंधनापेक्षाही गाड्यांचं पेट्रोल महाग झाल्याचं चित्र देशात निर्माण झालं आहे. शंभरी कधीच पार केलेल्या पेट्रोलपाठोपाठ डिझेलनंही काही ठिकाणी शंभरी पार केली आहे, तर काही ठिकाणी पार करण्याच्या बेतात आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सामान्य जनतेचं आर्थिक गणित कोलमडून पडलेलं असताना सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य माणूस चिंतेत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे देश आशेनं पाहात असताना त्यांना देखील इंधनाच्या वाढत्या दरांची चिंता असल्याचं समोर आलं आहे. करोनाचे परिणाम या मुद्द्यावर न्यूयॉर्कमध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निर्मला सीतारमण यांनी भारतातील इंधन दरवाढीविषयी भूमिका मांडली आहे. ब्लूमबर्ग क्विंटनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

करोना काळामध्ये देशाला बसलेल्या आर्थिक फटक्यामधून सावरण्याचा प्रयत्न भारतीय अर्थव्यवस्था करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. मात्र, त्यासोबतच, सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हानं देखील असल्याचं त्यांनी सांगितलं. यात प्रामुख्याने जागतिक बाजारपेठेत वस्तूंचे, विशेषत: इंधनाचे वाढणारे भाव हे एक मोठं आव्हान आहे. त्याचा परिणाम महागाई वाढण्यात होऊन केंद्र सरकारच्या खर्चावर मर्यादा पडण्यात होत असल्याचं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

“ज्या पद्धतीने इंधनाचे दर वाढत आहेत…”

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या मुलाखतीमध्ये देशात सातत्याने वाढणाऱ्या इंधनाच्या दरांवर चिंता व्यक्त केली आहे. “ज्या पद्धतीने देशात इंधनाचे दर वाढत आहेत, नवनवे उच्चांक गाठत आहेत, त्याचं मोठं आव्हान माझ्यासमोर आहे. अर्थ विभागातील आमची टीम देखील याकडे अभ्यासपूर्वक पद्धतीने पाहात आहे”, असं निर्मला सीतारमण म्हणाल्या. “ही अनिश्चितता माझ्यासाठी फार मोठी चिंतेची बाब आहे”, असं देखील त्यांनी नमूद केलं.

Story img Loader