तब्बल ६ दिवस आयकर विभागाची करभरणा करण्यासंदर्भातली मुख्य वेबसाईट बंद ठेवण्यात आली होती. यासाठी नवीन वेबसाईट आणली जात असल्याचं आयकर विभागाकडून सांगण्यात आलं होतं. e-filing 2.0 असं या वेबसाईटचं नाव आहे. मात्र, मोठा गाजावाजा करून सोमवारी रात्री सुरू करण्यात आलेली ही वेबसाईट काही वेळातच क्रॅश होत असल्याच्या तक्रारी नेटिझन्सकडून येऊ लागल्या. अनेक नेटिझन्सनी त्याचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले. ट्विटरवरच्या या तक्रारी पाहिल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विटरवरूनच या वेबसाईटवर काम करणारी इन्फोसिस आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक अध्यक्ष नंदन निलेकणी यांना सुनावलं आहे. त्यांना टॅग करून निर्मला सीतारमण यांनी ट्वीट केलं आहे.
The much awaited e-filing portal 2.0 was launched last night 20:45hrs.
I see in my TL grievances and glitches.
Hope @Infosys & @NandanNilekani will not let down our taxpayers in the quality of service being provided.
Ease in compliance for the taxpayer should be our priority. https://t.co/iRtyKaURLc
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) June 8, 2021
माझी अपेक्षा आहे की…!
या ट्विटमध्ये निर्मला सीतारमण यांनी इन्फोसिस आणि नंदन निलेकणी यांना अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे. “बहुप्रतिक्षित अशी e-filing portal 2.0 ही वेबसाईट काल रात्री (सोमवारी) ८ वाजून ४५ मिनिटांनी लाईव्ह झाली. पण मला त्यामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आळ्या आहेत. माझी अपेक्षा आहे की इन्फोसिस आणि नंदन निलेकणी आपल्या करदात्यांना पुरवल्या जाणाऱ्या सेवेमध्ये त्यांचा अपेक्षाभंग करणार नाहीत. करदात्यांसाठी करभरणा प्रक्रिया सुलभ व्हावी याला आपलं प्राधान्य असायला हवं”, असं ट्विट अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं आहे.
The much awaited e-Filing portal 2.0 went live at 20:45 hrs yesterday. An important milestone to make the compliance experience more taxpayer friendly.
In the service of the nation. https://t.co/DcAPZkl52C
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) June 8, 2021
केंद्रीय अर्थमंत्र्यांनीच केलं होतं केली होती घोषणा!
दरम्यान, सोमवारी रात्री हे वेब पोर्टल सुरू झाल्यानंतर खुद्द निर्मला सीतारमण यांनीच ट्वीट करून यासंदर्भातली माहिती करदात्यांना दिली होती. “बहुप्रतिक्षित e-filing portal 2.0 काल रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी सुरू झालं आहे. करदात्यांना करभरणा प्रक्रिया सुलभ करण्याच्या व्यवस्थेमधला हा मैलाचा दगड ठरला आहे. हे पोर्टल देशवासीयांच्या सेवेसाठी आहे”, असं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यानंतर काही तासांतच त्यांना इन्फोसिसला तांत्रिक बिघाडावरून सुनवावं लागल्याचं स्पष्ट झालं आहे.