युक्रेनविरुद्ध छेडलेल्या युद्धामुळे रशियामध्ये आर्थिक आणीबाणीसदृश्य परिस्थिती ओढवली असून, त्यावर तोडगा म्हणून रशियाच्या मध्यवर्ती बँकेने व्याजाचे दर ९.५ टक्क्यांवरून वाढवून थेट २० टक्के केले आहेत. रशियाचं रुबल हे चलन ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गेले असून रशियानं निर्यातदार कंपन्यांना विदेशी चलन विकण्यास सज्ज राहण्यास सांगितले आहे. रॉयटर्सनं या संदर्भात वृत्त दिले आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी रविवारी लष्कराला युक्रेनविरोधात अण्वस्त्र सज्ज होण्याचे आदेश दिल्यानंतर रुबलची ऐतिहासिक घसरण होत त्याचा भाव एका डॉलरला १२० इतका घसरला. युरोप व अमेरिकेनं रशियाविरोधात आर्थिक निर्बंधांची घोषणा केल्यानंतर रशियाचं चलन आधीच घसरणीच्या मार्गावर होतं ते आणखी घसरलं.
युद्धविषयक ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.
या सगळ्याचा परिणाम प्रचंड महागाईत होणार हे स्पष्ट असल्याने रशियाच्या मध्यवर्ती बँकेने महागाईचा वाढीचा दर चार टक्क्यांवर ठेवण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आणि त्यामुळेच आर्थिक आणीबाणी म्हणून व्याजाचे दर प्रचंड वाढवले. यामुळे रुबलचे अवमूल्यन व महागाईचा धोका कमी होईल अशी आशा बँकेने व्यक्त केली आहे.
रशियन नागरिकांच्या बचत केलेल्या पैशाचं अवमूल्यन या निर्णयामुळे होणार नाही व त्यांना त्यांच्या ठेवींवर जास्त व्याज मिळेल व परिणामी आर्थिक स्थैर्य राहील असा अंदाज आहे. यापूर्वी जेव्हा रशियानं युक्रेनकडून क्रिमीयाचं विलिनीकरण केलं होतं तेव्हा २०१४ मध्ये १७ टक्क्यांच्या वर व्याजाचे दर झाले होते. आता युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं रशियातील बँकांचा स्विफ्ट प्रणालीशी संबंध तोडल्यानंतर तीच वेळ आली आहे.
हेही वाचा – Russia Ukraine War : रशियन फौजेचे आता आक्रमक नाही तर बचावात्मक धोरण ; युक्रेनचा दावा!
रशियाच्या सांगण्यानुसार युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्यात आली असून प्रदेश गिळंकृत करणे हा हेतू नाहीये. या देशाच्या लष्करी सामर्थ्याचा बीमोड करणे आणि विघातक राष्ट्रवादी शक्तींना नेस्तनाबूत करणे हा आपला उद्देश असल्याचं रशिया सांगत आहे. रशियाच्या अर्थव्यवस्थेसाठी बाह्य घटक आमूलाग्र बदलले असल्याचे व्याजदर वाढवताना रशियाच्या मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे.