संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या ‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (२-डीजी) या कोविड-१९ प्रतिबंधक औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर सोमवारी याचे अनावरण करण्यात आले. हे औषध करोनाची सौम्य ते तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर सहायक उपचार पद्धती म्हणून वापरले जाईल. २-डीजी हे औषध रुग्णालयात असलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यात मदत करत असल्याचे, तसेच प्राणवायूच्या अतिरिक्त पुरवठ्यावरील त्यांचे वापर कमी करत असल्याचे प्राथमिक चाचण्यांमध्ये आढळून आले आहे, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले होते. संरक्षण अनुसंधान आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) करोना रुग्णांवरील उपचारासाठी २ डीजी (2-DG) नावाचं औषध तयार केलं आहे. हे औषध कोणत्या रुग्णांना द्यावे आणि कोणत्या नाही, याबाबत जाणून घेऊ या…

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी या अँटी-कोविड औषध २-डीजीचे पहिल्या बॅचचे अनावरण केले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्ली एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांच्याकडे औषधाचा साठा सुपूर्द केला होता.

कोणाला हे औषध द्यावे?

२ डीजी औषधाबाबत डीआरडीओने ट्वीटरवरुन माहिती दिली आहे. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारचं देता येईल. सुरवातीला हे औषध सौम्य ते तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना शक्य तितक्या लवकर द्यावे आणि जास्तीत जास्त दहा दिवस हे औषध दिले जाऊ शकते. मधुमेह, गंभीर ह्रदयाची समस्या, एआरडीएस, गंभीर यकृताचा त्रास आणि मुत्र विकार असलेल्या रुग्णांना हे औषध देताना डॉक्टरांनी अधिक काळजी घ्यावी. सहव्याधी असणाऱ्या रुग्णांवर औषधाचा परिणाम अभ्यासलेला नाही, असे डीआरडीओने स्पष्ट केलं आहे.

कोणाला देऊ नये? रुग्णालयांना कसे उपलब्ध होणार?

तसेच २ डीजी औषध गर्भवती महिला, स्तनपान सुरु असणाऱ्या महिला आणि १८ वर्षाखालील रुग्णांना देऊ नये, असा सल्ला डीआरडीओने रुग्ण आणि परिचारीकांना दिला आहे. तसेच रुग्णालयांना हे औषध हवे असल्यास त्यांनी रेड्डी लॅबच्या मेल आयडी 2DG@drreddys.com वर संपर्क साधावा, असे आवाहन डीआरडीओने केले आहे.

२-डीजी कसे काम करते

२-डीजी हे औषध पावडरच्या स्वरूपात येते. ते पाण्यात मिसळून घेतले जाते. करोनाचा संसर्ग झालेल्या पेशींमध्ये ते जमा होते आणि करोनाच्या विषाणूला वाढण्यापासून थांबवते. नेमक्या विषाणू संसर्गित पेशींमध्ये जमा होणे हे या औषधाचे वैशिष्ट्य आहे. या औषधाचे सहजरीत्या उत्पादन करता येऊन ते देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध केले जाऊ शकते, असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

Story img Loader