काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाटक काँग्रेसचे नेते रमेश बाबू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हाय ग्राऊंड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.
रमेश बाबू यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत अमित मालवीय यांच्यावर खोटी माहिती पसरवण्याचा आणि मतदारांमध्ये द्वेषभावना पसरवण्याचा आरोप केला आहे. अमित मालवीय यांनी १७ जून रोजी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या व्हिडीओविरोधात ही पोलीस तक्रार आहे.
काँग्रेसचं म्हणणं काय?
रमेश बाबू म्हणाले, “अमित मालवीय यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ राहुल गांधी यांची बदनामी करणारा आहे. आ व्हिडीओतून लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकांची दिशाभूल व्हावी आणि देशातील धार्मिक सौहार्दाचं वातावरण बिघडावं म्हणून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.”
हेही वाचा : Video : “RaGa, एक मोहरा!”, राहुल गांधींना लक्ष्य करणारं भाजपाचं सोशल कॅम्पेन
अमित मालवीय यांनी नेमका कोणता व्हिडीओ पोस्ट केला?
अमित मालवीय यांनी एक अॅनिमेटेड व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी राहुल गांधी विदेशातील शक्तींबरोबर मिळून देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. तसेच राहुल गांधी या विदेशी शक्तींचे हस्तक आहेत, असाही आरोप मालवीय यांनी केला.
हेही वाचा : २००४ साली राहुल गांधींचा सक्रीय राजकारणात प्रवेश, पण त्यापूर्वी ते काय करत होते?
अमित मालवीय यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम १५३ (अ) – समाजात तेढ निर्माण करणे, कलम १२० (ब) – गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे, कलम ५०५ (२) शत्रुत्वभावना निर्माण होईल अशी वक्तव्ये करणे आणि कलम ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.