BJP MLA Balmukund Acharya over protest outside Jamia Masjid in Jaipur : जयपूरमधील जामिया मशिदीबाहेर शुक्रवारी घोषणाबाजी केल्याबद्दल भाजपाचे हवा महल येथील आमदार बालमुकुंद आचार्य यांच्यावर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले होते आणि अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा आमदार आणि त्यांच्या समर्थक शुक्रवारी रात्री १० वाजता मशि‍दीच्या बाहेर जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यामुळे दुसरा एक गट परिसरात जमा झाला आणि दोन्हीमध्ये वाद सुरू झाला. यानंतर जयपूरचे आयुक्त बिजू जॉर्ज तसेच काँग्रेसचे आमदार रफिक खान आणि अमीन कागझी हे देखील घटनास्थळी पोहोचले.

या घटनेनंतर मानक चौक पोलिस स्टेशनमध्ये जाम मशिद कमिटीने दिलेल्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोप केला की भाजपा आमदार मशिदीत बूट घालून आले आणि त्यांनी भिंतीवर काही पोस्टर लावण्याचा प्रयत्न केला.

“हे फक्त आंदोलन नव्हते. हा जाणीवपूर्वक शांतता भंग करण्याचा प्रयत्न होता,” असे खान यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले. “ही घुसखोरी आहे आणि ते अस्वीकार्य आहे. आम्ही एफआयआर नोंदवला केला आहे आणि हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे घेऊन जाण्याचा आमचा विचार आहे,” असेही खान म्हणाले.