FIR against OYO and  founder Ritesh Agarwal : ओयो (OYO) आणि या कंपनीचे संस्थापक रितेश अग्रवाल हे मोठ्या आडचणीत सापडले आहेत. कारण जयपूर येथील एका रिसॉर्टने ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्म ओयो (OYO) विरोधात एफआयआर दाखल केली आहे. या रिसॉर्टला कोट्यवधीची जीएसटीची नोटीस आल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीएसटीची नोटीस ओयोने दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारावर पाठवण्यात आल्याचा दावा या रिसॉर्टने केला आहे.

संस्कार रिसॉर्ट्स (Samskara Resorts) शी संबंधित मदन जैन यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जयपूरच्या अशोक नगर पोलीस ठाण्यात गेल्या आठवड्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. संस्कार रिसॉर्टला २.६६ कोटी रुपयांच्या जीएसटीसंबंधी कारणे दाखवा नोटीस मिळाल्याचे जैन यांनी सांगितले. वार्षिक उलाढाल वाढवून दाखवण्यासाठी संस्कार रिसॉर्टच्या नावावर हजारो बनावट बुकिंग दाखवण्यात आल्या, असेही जैन यांनी त्यांच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

एफआयआरमध्ये ओराव्हेल स्टेज प्रायव्हेट लिमिटेड किंवा ओयो याबरोबरच संस्थापक आणि ओयो समुहाचे सीईओ रितेश अग्रवाल यांच्यासह इतरांची नावे देखील देण्यात आली आहेत.

या एफआयआरमध्ये ऑरवेल स्टेज प्रायव्हेट लिमिटेड किंवा ओयो, तसेच ओयोचे संस्थापक आणि ग्रुप सीईओ रितेश अग्रवाल यांच्या नावांचा समावेश आहेत. याबरोबरच इतरही अनेक जणांची नावे एफआयआरमध्ये देण्यात आली आहेत आहेत. भारतीय न्याय संहितेच्या फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे अशा वेगवेगळ्या कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

एफआयआरमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, जयपूरमधील संस्कार रिसॉर्टमध्ये ऑनलाईन बुकिंग्स याबरोबरच वॉक इन सेवा देखील दिल्या जातात. संस्कार आणि ओयो यांच्यामध्ये १८ एप्रिल २०१९ मध्ये १२ महिन्यांसाठी करार झाला होता पण ओयोने कथितरित्या संस्कारमध्ये आर्थिक वर्ष २०१८-१९, २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये देखील बुकिंग दाखवल्या, असे जैन म्हणाले आहेत.

तसेच एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, १८ एप्रिल २०१९ ते २० एप्रिल २०२० दरम्यान, ओयोने संस्कारला १०.९५ लाख रुपयांचा व्यवसाय दिला, ज्याकरिता रिसॉर्टने जीएसटी भरला होता. मात्र ओयोने संस्कारबरोबर २२.२२ कोटी रुपयांचा कथित व्यवसाय झाल्याचे दाखवले, ज्यामुळे दंडाच्या रकमेसह २.६६ कोटी रुपयांचा जीएसटी बिल थकीत आहे.

राजस्थानच्या हॉटेल फेडरेशनचे अध्यक्ष हुसैन खान यांनी आरोप केला की ओयेने वाढीव बिले दाखवल्याच्या आधारावर जवळपास २० हॉटेल्सना जीएसटीच्या नोटीसा मिळाल्या आहेत. तसेच ते म्हणाले की, ओयोचा हॉटेल्सबरोबरचे रेकॉर्ड खराब आहे आणि चार वर्षांपूर्वीही आम्ही त्याविरुद्ध मोहीम चालवली होती, १२५ हॉटेल्सनी हॉटेल्सबाहेर बॅनर लावले होते की आम्ही ओयो बुकिंग स्वीकारत नाही. दरम्यान या प्रकरणी ओयोच्या प्रवक्त्यांशी संपर्क होऊ शकला नाही.