भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग आणि अन्य पाच जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शुक्रवारी स्थानिक न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. सहा महिन्यांपूर्वी दिग्विजय सिंग यांच्या उज्जन दौऱ्यादरम्यान भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. त्यामुळे संतप्त काँग्रेस नेत्यांनी पाठलाग करून भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती.
सदर मारहाणप्रकरणी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी दिग्विजय सिंग, उज्जनचे खा. प्रेमचंद गुड्डू, हेमंत चौहान, दिलीप सिंग, महेश परमार आणि अन्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांविरोधात येथील जिवाजीगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
या प्रकरणी आज सुनावणी करताना अतिरिक्त जिल्हा न्यायमूर्ती दीपेश तिवारी यांनी काँग्रेस महासचिव दिग्विजय सिंग, गुड्डू आणि अन्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांविरोधात कलम ३०७ नुसार खुनाचा प्रयत्न आणि ३२६ आणि २३४ नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.     

Story img Loader