स्त्रियांच्या स्तनांची कापलेल्या कलिंगडाशी तुलना करणाऱ्या केरळमधील प्राध्यापकाविरोधात स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जोहर मुनावीवीर असे या प्राध्यापकाचे नाव असून तो कोझीकोड येथील फारूख ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षक आहे. आपल्याच कॉलेजच्या विद्यार्थींनीच्या पोषाखाबद्दल जोहरने हे वादग्रस्त वक्तव्य केले. कॉलेजमध्ये येणाऱ्या मुली त्यांची संपूर्ण छाती हिजाबने झाकून घेत नाहीत. आपल्या छातीचे कापलेल्या कलिंगडासारखे प्रदर्शन करतात असे वक्तव्य जोहरने केले होते.
मी ज्या कॉलेजमध्ये शिकवतो तिथे ८० टक्के विद्यार्थींनी असून बहुसंख्य मुस्लिम आहेत. धार्मिक परंपरेप्रमाणे या मुली पोषाख परिधान करत नाहीत. हिजाबने त्या आपली छाती झाकून घेत नाहीत. कापलेल्या कलिंगडासारखा छातीचा काही भाग दाखवतात असे जोहर मुनावीवीर म्हणाला होता.
जोहर मुनावीवीरच्या या विधानाचा दोन विद्यार्थिनींनी टॉपलेस फोटो पोस्ट करुन निषेध केला. आम्ही या कृतीतून वक्तव्याचा निषेध केला असल्याचे या विद्यार्थिनींनी म्हटले होते. हे फोटो काही काळातच व्हायरल झाले. फोटो व्हायरल झाल्यावर याची चर्चाही चांगलीच झाली. त्यामुळे फेसबुकने या दोन मुलींचे अकाऊंट बंद केले आणि हे फोटो काढून टाकले. मात्र या शिक्षकाचा निषेध केला जातो आहे.
महिलांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी या शिक्षकाचा निषेध म्हणून त्याला अर्धी कापलेली कलिंगडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर अनेक विद्यार्थिनीही या वक्तव्याचा निषेध सोशल मीडियावर आणि जाहीररित्याही करताना दिसत आहेत. आम्ही काय कपडे घालायचे, कसे दिसायचे हा आमचा अधिकार आहे. त्यावर शेरेबाजी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणीही दिलेला नाही. कोणत्याही मुलीच्या शरीराबाबत अश्लील टिपण्णी करण्याचा अधिकार कोणालाही नाही असे या महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने म्हटले आहे.