कारगिल युद्धाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे सपाचे नेते आझम खान यांच्याविरुद्ध धर्माच्या नावाखाली समाजात वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गझियाबाद पोलिसांनी एफआयआर नोंदविला आहे. मात्र तरीही आझम खान आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले आहेत.
आझम खान यांच्याविरोधात एफआयआर नोंदविण्यापूर्वी गझियाबादमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. त्यानंतर कारगिल युद्धाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला.
कारगिल युद्धात भारताला हिंदू जवानांनी नव्हे तर मुस्लीम जवानांनी विजय मिळवून दिला, असे वादग्रस्त वक्तव्य आझम खान यांनी ७ एप्रिल रोजी मसुरी येथील एका जाहीर सभेत केले होते. निवडणूक आयोगाने शुक्रवारी आझम खान यांच्यावर उत्तर प्रदेशात प्रचार करण्यावर बंदी घातली आणि त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.आझम खान यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असली तरी ते आपल्या विधानावर ठाम आहेत. आपण कोणतेही चुकीचे वक्तव्य केलेले नाही आणि आपण देशभक्त आहोत, असे त्यांचे म्हणणे आहे. आयोगाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती त्यांना करणार असल्याचे आझम खान म्हणाले.