दिल्ली पोलिसांनी एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने अलीकडेच नुपूर शर्मा, नवीन जिंदाल यांच्यासह अनेकांवर चिथावणी भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. असदुद्दीन ओवेसींसह स्वामी यती नरसिंहानंद यांचीही या एफआयआरमध्ये नावे असल्याचे सांगण्यात येत आहे.
अखाती देशात नुपूर शर्मांवर टिप्पणी
दुसरीकडे, एआयएमआयएमच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या संसद मार्गावर नुपूर शर्मा यांच्याविरोधात निदर्शने केली. यादरम्यान बराच गदारोळ झाला. या प्रकरणी पोलिसांनी २०-२५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही कार्यक्रमात पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर वाद अधिकच वाढला. अरब देशांमध्येही नूपुर शर्मा यांच्यावर टिप्पणी करण्यात आली होती. या वादानंतर दिल्ली पोलिसांनी द्वेष पसरवणाऱ्या, विविध समुदायांना भडकावणाऱ्या आणि सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या दोन्ही नेत्यांना भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे
नुपूर शर्मा आणि भाजपचे माजी नेते नवीन जिंदाल यांच्या कथित प्रक्षोभक वक्तव्यानंतर अनेक आखाती देशांनी निषेध केला होता. त्यानंतर भाजपने दोन्ही नेत्यांना निलंबित केले. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो आणि त्यामुळेच या नेत्यांवर पंथ किंवा धर्माचा अपमान केल्याप्रकरणी कारवाई केल्याचे भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.