आम आदमीच्या नावाने मतांचा जोगवा मागण्यासाठी गुजरातमध्ये गेलेले आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल निवडणूक आयोगाच्या बडग्याचे बळी ठरणार असल्याचे चिन्ह आहे. त्यांच्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवला आहे. दरम्यान, दिल्लीत आपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हाणामारीचीही दखल घेत आयोगाने पक्षाला नोटीस बजावली आहे.
नरेंद्र मोदींनी केलेला विकास पाहण्यासाठी केजरीवाल गुजरातमध्ये
देशात बुधवारी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यानंतर लगेचच देशभरात आचारसंहिता लागू झाली. असे असताना बुधवारी केजरीवाल यांनी गुजरातमधील पाटण येथे प्रचारकीय ‘रोड शो’ केला. मात्र, केजरीवाल यांनी या ‘रोड शो’साठी पोलिसांची परवानगीच घेतली नव्हती असे उघड झाले आहे. त्यामुळे केजरीवालांनी सकृतदर्शनी आचारसंहिता भंग केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोदींवर टीका सुरूच
दरम्यान, केजरीवाल यांनी गुरुवारी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्य केले. मोदी हे गुजरातचे विकासपुरूष नसून केवळ उद्योजकांचेच त्यांनी भले केले असल्याची टीका केजरीवाल यांनी कच्छ येथील सभेत केली. मुंद्रा येथील अडानी बंदर व विशेष आर्थिक क्षेत्रातील शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतल्यानंतर ही टीका केली.
गुजरात पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार केजरीवाल यांनी ‘रोड शो’ साठी पूर्वपरवानगी मागितली नव्हती. बुधवारीच देशभर आचारसंहिता लागू झाली असताना पूर्वपरवानगीशिवाय प्रचार करणे हा सकृतदर्शनी तरी आचारसंहितेचा भंग आहे.
– एच. एस. ब्रह्मा, निवडणूक आयुक्त
आम्ही केजरीवाल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले नव्हते. निवडणूक आचारसंहितेचे नियम समजावून सांगण्यासाठीच त्यांना पोलीस ठाण्यात नेले होते.
– परिक्षित राठोड, पाटणचे पोलीस अधीक्षक