Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गेल्या काही दिवसांपासून महाकुंभमेळा सुरु आहे. या कुंभमेळ्याला देशभरातून लाखो भाविकांनी सहभाग घेतला आहे. महाकुंभमेळ्यात आतापर्यंत लाखो भाविकांनी पवित्र स्नान केलं आहे. मात्र, कुंभमेळ्यात आग लागल्याच्या आतापर्यंत तीन घटना घडल्या आहेत. आजही पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. महाकुंभमेळ्यातील सेक्टर १८ आणि १९ मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत अनेक तंबू जळून खाक झाले आहेत.
महाकुंभमेळ्याच्या सेक्टर १८ आणि १९ मध्ये भीषण आग लागली. या आगीत अनेक तंबू जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीची घटना घडल्यानंतर लगेच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, ही आगीची घटना घडल्यामुळे भाविकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली असंही सांगण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
बचाव आणि मदत कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) च्या टीम देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. तसेच सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनेक भाविकांचे साहित्य जळून खाक झाले असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या आठवड्यातही महाकुंभमेळ्याच्या सेक्टर १८ मध्येही अशीच आग लागली होती. शंकराचार्य मार्गावरील हरिहरानंद कॅम्पमधील २० हून अधिक तंबूंमध्ये आग पसरली होती. तेव्हाही अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं होतं.
१९ जानेवारीलाही आग लागल्याची घटना घडली होती
महाकुंभमेळ्याच्या जत्रा परिसरात १९ जानेवारी रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास आग लागल्याची एक घटना घडली होती. शास्त्री पुलाजवळ सेक्टर १९ येथील गीता प्रेसच्या कॅम्पमध्ये आग लागली होती. आगीत गीता प्रेसच्या १८० कॉटेज जळून खाक झाल्या होत्या. दरम्यान, त्या आधी महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दरम्यान चेंगराचेंगरी घटना घडली होती. त्या घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला होता तर ६० जण जखमी झाल्याचीही घटना घडली होती.