‘वंदे भारत एक्स्प्रेस’ देशभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातल्या विविध भागात अनेक वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून त्यांचं उद्घाटन करण्यात आलं आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या वैशिष्ट्यांबरोबरच या एक्स्प्रेसला होणाऱ्या अपघातांचीही चर्चा पाहायला मिळाली. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर पहिल्या काही महिन्यांत वन्य प्राणी वा इतर पाळीव जनावरं ट्रॅकवर आल्यामुळे झालेल्या अपघातात काही ट्रेनच्या पुढच्या भागाचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आता एका वंदे भारत एक्स्प्रेसच्या कोचलाच आग लागल्याची घटना समोर आली आहे.
सोमवारी सकाळी भोपाळ ते दिल्ली वंदे भारत एक्सप्रेसच्या कोचला अचानक आग लागल्याचं निदर्शनास आलं. या कोचमध्ये बसवण्यात आलेल्या बॅटरीला ही आग लागल्याची बाब समोर आली आहे. मध्य प्रदेशमधील रानी कमलापती (पूर्वीचे हबीबगंज) स्थानकातून ही ट्रेन दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकाच्या दिशेने रवाना झाल्यानंतर काही वेळाने हा प्रकार घडला.
बॅटरी बॉक्सला आग लागल्याची बाब कुरवाई केथोरा स्थानकाजवळ निदर्शनास आली. यानंतर तातडीने ट्रेन थांबवून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. ट्रेनमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढून आग विझवण्याचं काम हाती घेण्यात आलं. “वंदे भारत एक्सप्रेसच्या कोचला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झालं आणि ही आग आटोक्यात आणण्यात आली”, अशी माहिती रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
एप्रिल महिन्यात केलं होतं उद्घाटन!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अवघ्या चार महिन्यांपूर्वी अर्थात एप्रिल महिन्यात या मार्गावरील रेल्वे सेवेचं उद्घाटन केलं होतं. या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस साडेसात तासांमध्ये ७०१ किलोमीटरचं अंतर पार करून रानी कमलापती स्थानकाहून हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर पोहोचते.