दिल्ली येथील मुंडका मेट्रो रेल्वे स्थानकाजवळील एका तीन मजली व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत एकूण २० जणांचा होरपळून मृत्यू झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंडका मेट्रो स्थानकाजवळील एका तीन मजली इमारतीला शुक्रवारी (१३ मे) सायंकाळी अचानकपणे आग लागली. ही आग एवढी भीषण होती की यामध्ये आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर बचाव पथकाने अनेक नागरिकांना इमारतीतून बाहेर काढले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

घटनास्थळी अग्निशमाक दलाचे १५ बंब दाखल

ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र ही आग दुसऱ्या मजल्यावर लागली आहे. घटनेची माहिती होताच अग्निशामक दलाचे १५ बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच आगीची तीव्रता वाढत असल्यामुळे आणखी काही बंब बोलवण्यात आले. तर दुसरीकडे आगीची घटना समोर येताच पोलिसांनी तातडीने खबरदारी म्हणून या भागात फौजफाटा तैनात केला तसेच या भागात नाकेबंदी केली. बचावपथकाने आतापर्यंत ५० ते ६० जणांना रेस्क्यू केले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले दु:ख

आगीच्या याघटनेत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे रेस्क्यू केलेल्या नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र अनेक नागरिक या आगीत होरपळल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान याघटनेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अशा कठीण काळात त्यांनी मृतांच्या कुंटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Story img Loader