आग लागली तर पाण्यानं विझवतात. पण पाण्याला आग लागली तर ती काय करणार? हा काल्पनिक प्रश्न नाहीये, तर खरोखरच पाण्याला आग लागली आहे. ते ही महासागरातील पाण्याला आग लागल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा प्रकार घडलाय मेक्सिकोमध्ये. ही आग समुद्राखालून गेलेल्या गॅस पाइपलाइनला गळती लागल्याने लागली आहे, असा अंदाज आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर आगीचे लोट उडताना व्हिडिओत दिसत आहेत. ही आग जवळपास पाच तास धगधगत होती. समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक झाली की काय?, असा प्रश्न अनेकांना पडला होता. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही पाइपलाइन मेक्सिकोमधील पेमेक्स पेट्रोल या सरकारी कंपनीची आहे. या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरीही बुचकळ्यात पडले आहेत.
पाच तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे, अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिली आहे. ही पाइपलाइन पेमेक्स कंपनीच्या कू मालूब जॅप ऑइल डेव्हलपमेंट सेंटरशी जोडलेली आहे. या सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचं उत्पादन होतं. यामुळे सरकारला १.७ मिलियन बॅरेल तेल रोज मिळतं. पेमेक्सच्या तेल उत्पादनात कू मालूब जॅपचा ४० टक्के इतका सहभाग आहे. मेक्सिको खाडीतील दक्षिण भागात या सेंटरची बांधणी करण्यात आली आहे. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे आगीचं नेमकं कारण काय आहे? याचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे मेक्सिको तेल सुरक्षा नियामक मंडळाचे प्रमुख अँजेल कॅरिजलेस यांनी पाइपलाइनमधून गळती झाल्याच्या बातमीचं खंडन केलं आहे. त्यामुळे नेमकी आग कशामुळे लागली याबाबत संभ्रम कायम आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला असल्याची माहिती पेमेक्सने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये नमुद करण्यात आली आहे.
The ocean is on fire in the Gulf of Mexico after a pipeline ruptured. Good system.
— Eoin Higgins (@EoinHiggins_) July 2, 2021
पेमेक्स तेल उत्पादक कंपनीचं २०२० वर्षात मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. करोनामुळे गेल्या वर्षाभरात तेलाच्या मागणीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे २३ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे. मात्र गेल्या तिमाहीत ५.९ अब्ज डॉलर्सचा फायदा झाला आहे. पेमेक्सवर सध्या ११४ अब्ज डॉलर्सचं कर्ज आहे.
धक्कादायक: पाच वर्षांची मुलगी होणार दगड!; दुर्मिळ आजारानं ग्रासलं
पेमेक्स कंपनीशी निगडीत औद्योगिक भागात आग लागल्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही २०१५ मध्ये खाडीतील अबकातुन ए परमनंट प्लॅटफॉर्मला आग लागली होती. त्यात झालेल्या स्फोटात चार मजुरांचा मृत्यू झाला होता, आणि १६ जण जखमी झाले होते. तसेच ३००हून अधिक जणांना शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढलं होतं. त्याचबरोबर जानेवारी २०१३ मध्ये मॅक्सिकोतील सिटी मुख्यालयात गॅस गळतीमुळे स्फोट झाला होता. त्यात ३७ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, सप्टेंबर २०१२ मध्ये तमाउलिपास राज्यातील नॅच्युरल गॅस प्लांटला आग लागली होती. यात ३० जणांचा मृत्यू झाला होता.