‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गोळीबार करत हल्ला करण्यात आला होता. उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी अज्ञान व्यक्तींनी ओवेसींवर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नाही. याप्रकरणी सचिन आणि शुभम अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक काळापासून ते हल्ल्याची तयारी करत होते, अशी माहिती समोर आली होती. त्यातच आता ओवेसी यांना जीवे मारण्यासाठीच हा हल्ला केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्य आरोपी सचिनने सांगितले की, त्याला मोठा राजकीय नेता व्हायचे आहे आणि ओवेसीचे भाषण ऐकून तो अस्वस्थ झाला. त्यामुळेच त्याने त्याचा जवळचा मित्र शुभमसोबत ओवेसीच्या हत्येचा कट रचला होता, असा खुलासा त्याने पोलिसांच्या चौकशीत केला आहे.
ओवेसी यांनी ‘झेड’ सुरक्षा नाकारली
“मी जेव्हा ओवेसींवर गोळीबार केला तेव्हा ते खाली वाकले. त्यामुळे मी खाली गोळी झाडली आणि मला वाटले की त्यांना गोळी लागली आहे. मग मी पळून गेलो,” असे त्याने पोलिसांना सांगितले.
“ओवेसींवर हल्ला करण्याची योजना अनेक दिवसांपासून सुरू होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून होतो आणि हल्ला करण्याची संधी शोधत त्यांच्या अनेक सभांना गेले होते. मात्र, गर्दीमुळे ते होऊ शकलं नाही. नंतर जेव्हा मला कळले की ते मेरठहून दिल्लीला जाणार आहे, तेव्हा मी त्यांच्या आधी टोलगेटवर पोहोचलो आणि गाडी येताच गोळीबार केला,” असे तो पोलीस चौकशीत म्हणाला.
हल्ल्यानंतर ओवेसींनी नाकारली ‘झेड’ सुरक्षा..
“मला झेड दर्जाच्या सुरक्षेची गरज नाही. मला ए दर्जाचे नागरिक होण्याची इच्छा आहे. मला जगायचे आहे, बोलायचे आहे. जेव्हा या देशातील गरीब सुरक्षित असतील, त्यावेळीच मी सुरक्षित असेल. माझ्या कारवर हल्ला करणाऱ्यांना घाबरायची मला गरज नाही. सरकार या हल्लेखोरावर ‘यूएपीए’नुसार का कारवाई करत नाहीत,” असे म्हणत ओवेसी यांनी झेड सुरक्षा नाकारली.