Kerala Fire Breaking News: दिवाळीच्या निमित्ताने फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणावर केली जाते. यासाठी ठिकठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लागलेले पाहायला मिळतात. विक्रीसाठीचे फटाके सुरक्षित ठिकाणी रचून ठेवले जातात. पण अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर फटाके एका ठिकाणी ठेवले असताना त्यांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात. केरळमध्ये अशीच एक दुर्घटना घडली असून त्यात तब्बल १५० व्यक्ती जखमी झाल्या आहेत. यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
नेमकं घडलं काय?
हा सगळा प्रकार केरळच्या नीलेश्वरम भागात घडला. या भागातील वीरारकवू मंदिर महोत्सवात आतिषबाजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फटाके मागवण्यात आले होते. मंदिर परिसरातच एका बाजूला हे फटाके रचून ठेवले होते. पण याच ठिकाणी आग लागून मोठी दुर्घटना घडली. सोमवारी मध्यरात्री ही आग लागली. महोत्सव असल्यामुळे मंदिर परिसरात मोठ्या संख्येनं भाविक जमा झाले होते. या आगीमुळे तब्बल १५० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर कासारगोड, कन्नूर आणि मंगळुरू भागातील रुग्णालयांत उपचार चालू आहेत.
या घटनेची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून पोलीस पथकासह स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली. या दुर्घटनेसाठी नेमकं काय कारण ठरलं, याबाबत सध्या तपास चालू आहे.