नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी गुरुवारी संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी एकत्र आल्यामुळे  महिन्याभरापासून अंतर्गत कलहाने ग्रस्त झालेल्या भाजपला काही प्रमाणात दिलासा मिळाला.
भाजप मुख्यालयात राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय मंडळाची बैठक तीन तास चालली. या बैठकीत केंद्राकडून इशरत जहाँ प्रकरणासह विविध प्रकरणांमध्ये होत असलेला सीबीआयचा दुरुपयोग, सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरलेले मनमोहन सिंग सरकार आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आखायची व्यूहरचना आदी मुद्यांवर चर्चा झाली. बैठकीला सुषमा स्वराज, अरुण जेटली, अनंतकुमार, रामलाल, वेंकय्या नायडू, थावरचंद गहलोत हे सदस्य उपस्थित होते. बैठकीदरम्यान मोदींनी केलेल्या काही सूचना अडवाणींनीही सकारात्मकपणे उचलून धरल्या. भाजपने मनमोहन सिंग सरकारच्या चौफेर अपयशावर भर देण्याची गरज अडवाणींनी व्यक्त केल्याचे समजते.
दरम्यान, भाजपच्या नऊ राष्ट्रीय सरचिटणीसांचा समावेश असलेल्या निवडणूक प्रचार समिती स्थापन करण्याचीही सज्जता मोदी यांनी केली आहे. या समितीत मुख्तार अब्बास नकवी, सुधांशु त्रिवेदी, पियुष गोयल तसेच व्ही. सतीश आणि सौदान सिंह या संघटन सहसचिवांचाही समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

Story img Loader