Pakistan Firing Along with LOC: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारतात वातावरण तापू लागलेलं आहे. जगभरातून अनेक देशांनी भारताला या लढ्यात पूर्ण पाठिंबा असल्याचं नमूद केलं आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे भारताकडून पाकिस्तानविरोधात सीमाबंदीचं पाऊल उचलण्यात आलेलं असताना दुसरीकडे पाकिस्तान मात्र वारंवार चुकांवर चुका करताना दिसत आहे. पहलगाम हल्ल्याच्या २४ तासांत बांदीपोरा भागात लष्करानं घुसखोरांशी दोन हात केल्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा पाकिस्ताननं सीमेपलीकडून आगळीक केल्याचं समोर आलं आहे.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर भारत व पाकिस्तान यांच्यातील आधीच तणावपूर्ण बनलेले संबंध अधिकच चिघळले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने गोळीबाराची घटना घडली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या या आगळिकीला भारतीय लष्करानं सडेतोड उत्तर दिलं आहे. या कारवाईत अद्याप कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ काही ठिकाणी पाकिस्तानकडून ही कारवाई करण्यात आली असून त्यावर भारतीय जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. भारतानं पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान व पाकिस्तानी नागरिकांवर घातलेल्या निर्बंधांनंतर पाकिस्ताननंदेखील भारतीय निर्बंधांचा निषेध करत काही निर्णय गुरुवारी जाहीर केले. “आम्ही शिमला करारासह भारताशी झालेले इतर सर्व करार रद्द करण्याचं पाऊल उचलू”, असा इशारा पाकिस्तानकडून देण्या आला आहे. यानंतर आज पाकिस्ताननं सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.

पाकिस्तानची नेमकी भूमिका काय?

पहलगाम हल्ल्यामागे हात असल्याचा भारताचा दावा पाकिस्तानने फेटाळला आहे. उलट आपणही भारताप्रमाणेच करार द्विपक्षीय करार रद्द करण्याची भूमिका घेऊ, असा इशारा पाकिस्तानने दिला आहे. “सिंधू जल करार रद्द करण्याचा भारताचा निर्णय आम्ही फेटाळत आहोत. सिंधू करारानुसार पाकिस्तानमध्ये येणारं पाणी अडवण्याचा किंवा वळवण्याचा कोणताही प्रयत्न भारतानं केल्यास ती कृती पाकिस्तानविरोधातलं युद्धच ठरेल”, असं पाकिस्ताननं जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.