Nigeria Church Attack : आफ्रिकेतील नायजेरियामध्ये रविवारी कॅथोलिक चर्चवर भीषण हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये ५० हून अधिक लोकांना ठार केले. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. त्याच वेळी, मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांनी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या लोकांवर शस्त्रांनी हल्ला केला आणि ग्रेनेड फेकले. बंदुकधारी हल्लेखोरांनी चर्चच्या इमारतीच्या बाहेर आणि आतील लोकांवर गोळ्या झाडल्या, असे ओंडो राज्याचे पोलीस प्रवक्ते फनमिलायो इबुकुन ओदुनलामी यांनी सांगितले.
रविवारी पेन्टेकोस्ट सण साजरा करण्यासाठी ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जमले होते. चर्चमध्ये सर्वत्र आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते. त्यानंतर बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजाने चर्चचा परिसर हादरून गेला. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर जखमींना चर्चमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नायजेरियातील कॅथोलिक चर्चचे प्रवक्ते रेव्हरंड ऑगस्टीन इक्वू यांनी सांगितले की, “हे खूप दुःखदायक आहे की पवित्र मास सुरू असताना, अज्ञात बंदूकधाऱ्यांनी सेंट फ्रान्सिस कॅथोलिक चर्चवर हल्ला केला. अनेकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी आहेत.”
एपी या वृत्तसंस्थेनुसार, या हल्ल्यात किमान पन्नास जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अधिकृतपणे नायजेरियन अधिकार्यांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केलेली नाही पण स्थानिक माध्यमांनी अहवालात मृतांची संख्या पन्नासपेक्षा जास्त असल्याचे सांगितले आहे. हा हल्ला कोणी आणि का केला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. हे स्थानिक गटाचे काम आहे की दहशतवादी हल्ला, याबाबत प्रशासन काहीही बोलण्याचे स्पष्टपणे टाळत आहे.
नायजेरियातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या हल्ल्याबाबत अधिक माहिती दिलेली नाही. याशिवाय संशयितांचा कोणताही सुगावा अद्याप लागलेला नाही. ओवो शहराचे लोकप्रतिनिधी ओलुवोले यांनी या घटनेबाबत सांगितले की, ओवोच्या इतिहासात इतकी भयानक आणि क्रूर घटना कधीच घडली नव्हती.
रुग्णालयातील डॉक्टरांनी रॉयटर्सला सांगितले की हल्ल्यातील किमान ५० मृतदेह शहरातील दोन रुग्णालयांमध्ये आणण्यात आले आहेत. डॉक्टरांनी जखमींच्या उपचारासाठी रक्तदान करणे आवश्यक असल्याचेही सांगितले. दरम्यान, नायजेरिया हा ईशान्येकडील इस्लामी बंडखोरी आणि सशस्त्र टोळ्यांशी लढत आहे जे खंडणीसाठी हल्ले आणि अपहरण करतात.