‘शार्ली एब्दो’ मासिकाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याला २४ तास उलटण्याच्या आतच पॅरिसच्या दक्षिण भागात गुरुवारी पुन्हा एका तरुणाने केलेल्या गोळीबारात दोघे गंभीर जखमी झाले. एक पोलीस आणि स्थानिक संस्थेचा कर्मचारी हे दोघे गोळीबारामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. या गोळीबाराचा बुधवारी ‘शार्ली एब्दो’वर झालेल्या हल्ल्याशी काही संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दक्षिण पॅरिसमध्ये झालेल्या गोळीबारानंतर फ्रान्सचे गृहमंत्री बेना किझनिव्ह तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. बुधवारी झालेल्या हल्ल्यानंतर फ्रान्स पोलीसांनी पॅरिससह लगतच्या भागामध्ये शोधमोहिम सुरू केली आहे. शार्ली एब्दोवर हल्ला करणारे दोघे जण भाऊ असून, त्यांचा शोध घेण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात छापे टाकण्यात येत आहेत. या दोन्ही आरोपींची रेखाचित्रेही पोलीसांनी प्रसिद्ध केली असून, त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे असून ते दोघेही धोकादायक असल्याचा संदेश नागरिकांसाठी देण्यात आला आहे.
पॅरिसमधील ‘शार्ली एब्दो’ मासिकाच्या कार्यालयात झालेल्या गोळीबारात १२ जण ठार झाले होते. मृतांमध्ये १० पत्रकार आणि दोन पोलीसांचा समावेश आहे.
पॅरिसच्या दक्षिण भागात गोळीबार, दोघे जखमी
'शार्ली एब्दो' मासिकाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याला २४ तास उलटण्याच्या आतच पॅरिसच्या दक्षिण भागात गुरुवारी पुन्हा एका तरुणाने केलेल्या गोळीबारात दोघे गंभीर जखमी झाले.
First published on: 08-01-2015 at 03:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing in south paris two injured