एपी, टेक्सास/रोचेस्टर हिल्स
अमेरिकेत दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. टेक्सास पार्क आणि डेट्रॉईट उपनगरात या गोळीबारीच्या घटना घडल्या. टेक्सासमधील घटनेत दोन जण मृत्युमुखी तर अनेक जण जखमी झाले. तर डेट्रॉईट उपनगरातील गोळीबारात ९ जण जखमी झाले असून, यात ८ वर्षांच्या मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
ऑस्टिनच्या उत्तरेकडे सुमारे ३० किलोमीटर अंतरावर राऊंड रॉक येथील ओल्ड सेटलर्स पार्क येथे जुनीटीन्थ उत्सव सुरू होता. येथील मैफिलीत शनिवारी रात्री ११ च्या सुमारास दोन गटांमध्ये बाचाबाची झाली आणि गोळीबार सुरू झाला. घटनास्थळी मृत झालेले दोघेजण या वादात सहभागी नव्हते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले पोलीस अधिकारी आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तत्काळ जखमींना आपत्कालीन वैद्याकीय सेवा देण्यास सुरुवात केली. नंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून, तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा >>>पुतळ्यांचे एकाच जागी स्थलांतर; मावळते लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांचे स्पष्टीकरण
दुसऱ्या घटनेत वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शनिवारी डेट्रॉईट उपनगरात जमलेल्या नागरिकांवर झालेल्या गोळीबारात ९ जण जखमी झाले. यामध्ये दोन लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या संशयिताचा माग काढला असता, त्याने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत ८ वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर आहे.
सायंकाळी ५ च्या सुमारास हा गोळीबार झाला. सुमारे २८ गोळ्या त्याने झाडल्या. यानंतर नागरिकांची एकच धावपळ उडाली. गोळीबार करणारी व्यक्ती नंतर स्वत:च्या कारने तेथून बाहेर पडली. पोलीस माग काढत त्या व्यक्तीच्या घरी गेले असता, तेथे ही व्यक्ती मृतावस्थेत सापडली.