शिक्षक भरती परिक्षेत टॉपर आलेल्या तरुणाला पोलिसांनी केली अटक केली आहे. साध्या प्रश्नांची उत्तरं न देऊ शकल्याने तसंच नोकरी मिळवण्यासाठी खोट्या मार्कशीट्स सादर केल्याने ही अटक करण्यात आली. फिरोजाबाद पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. 2015 मध्ये पार पडलेल्या शिक्षण भरती परिक्षेत त्याने पहिला क्रमांक मिळवला होता.

आशिष कुमार असं या तरुणाचं नाव असून तो भंडारी गावचा रहिवासी आहे. परिक्षेत पहिला आल्याने त्याला प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून भरती करुन घेण्यात आलं होतं. आशिष कुमारने बीपीईडीचं (बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन) 88 टक्के मिळालेली खोटी मार्कशीटही सादर केली होती.

2015 मध्ये शिक्षण विभागाने प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी 12 हजार 460 जागांची भरती केली होती. या परिक्षेत आशिष कुमार पहिला आला होता. तपासादरम्यान आशिष कुमारने नोकरी मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रं सादर केलं असल्याचं समोर आलं.

‘मेरिट लिस्टच्या आधारे आशिष कुमारला 2 मे 2018 रोजी प्राथमिक शाळेत नोकरी देण्यात आली होती. त्याच्या कागदपत्रांची पडताळणी होणं बाकी होतं. शिक्षण विभागाला अनेकांनी खोटी कागदपत्रं सादर करुन नोकरी मिळवली असल्याची तक्रार मिळाली होती. यानंतर तपास केला असता आशिष कुमार एकदाही कॉलेजला गेलं नसल्याचं समोर आलं’, अशी माहिती तपास अधिकाऱ्याने दिली आहे.

कॉलेजने आशिष कुमारचा कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचं सांगितल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं होतं. यावेळी काही साध्या प्रश्नांची उत्तरंही तो देऊ शकला नाही. आशिष कुमारने यावेळी माणसाच्या शरिरात 256 हाडं असतात असं सांगितलं. इतकंच काय तर चौथीच्या वर्गातील गणितंही तो सोडवू शकला नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आशिष कुमारला अटक केली आहे.

Story img Loader