पीटीआय, जम्मू : अमरनाथ यात्रेसाठी जम्मूतील यात्रा तळावर जमलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याचे भय असताना भाविकांच्या उत्साहावर त्याचा तसूभरही परिणाम झाला नसून बम बम बोले आणि जय बर्फानी बाबा की चा जयघोष मंगळवारी आसमंतात दुमदूमत होता. तळावरील यात्रेकरून बुधवारी दक्षिण काश्मीरमधील अमरनाथ गुहेकडे कूच करतील.
करोना महासाथीच्या काळातील दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पुन्हा अमरनाथ यात्रा निघत आहे. भगवान शंकर आणि भारतीय सुरक्षा दलांवरील विश्वासामुळे आपण यात्रेत सहभागी झाल्याचे भाविकांनी सांगितले. जम्मूतील या तळावरील यात्रेकरूंची पहिली तुकडी बुधवारी येथून रवाना होणार आहे. तळावर, निवास आणि नोंदणी व्यवस्थेच्या ठिकाणी आणि परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवली असून जम्मू शहरात सुमारे पाच हजार जवान तैनात केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मूत यात्रेसाठी सुमारे तीन हजार भाविक आले असून त्यांची व्यवस्था तळावर करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यात्रेच्या राममंदिर तळावर चारशे साधू आले आहेत. यात्रेसाठी जाहीर केलेल्या अधिकृत तारखेच्या एक दिवस आधीच पहिली तुकडी तळावरून रवाना होणार आहे.
ना चिंता ना भय, बाबा अमरनाथ की जय. आमचा भगवान शिव आणि आपल्या जवानांवर पूर्ण विश्वास आहे. यात्रेच्या नोंदणीसाठी अत्यंत सुलभ, विनाअडथळा प्रक्रिया ठेवली असून येथील व्यवस्था अत्यंत चांगली आहे.
– विनयकुमार, लखनौहून अमरनाथ यात्रेसाठी आलेले भाविक.