पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर केंद्र सरकारच्या सर्वच विभागांनी उत्साहाने ‘स्वच्छ भारत’ अभियानात भाग घेतला खरा; परंतु साफसफाईनंतर जमा झालेल्या ई-कचऱ्याचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या निमित्ताने सरकारी कार्यालयांतील अडगळीत पडलेले संगणक, प्रिंटर्स, फायली यांवरील धूळ झटकली गेली. मात्र, संगणकाशी संबंधित ‘ई-कचऱ्या’ची विल्हेवाट कशी लावायची, याचे निश्चित धोरण नसल्याने वेगवेगळ्या खोल्यांत विखुरलेला कचरा एका मोठय़ा खोलीत जमा करण्यातच गुरुवारचा दिवस मावळला.
दिल्लीस्थित शास्त्री भवनातील विविध मंत्रालयांच्या खोल्यांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून अडगळीत पडलेले संगणकाशी संबंधित सामान ‘स्वच्छ भारत’ अभियानाच्या निमित्ताने बाहेर काढण्यात आले. संगणक, वायर्स, प्रिंटर्स एका ठिकाणी गोळा करण्यात आले. सरकारी नियमानुसार ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी व लिलाव करण्यासाठी विभागांतर्गत समिती नेमली जाते. दहा वर्षांपासून हा कचरा गोळा होत होता, पण समिती नेमण्यात आली नव्हती. आता खुद्द पंतप्रधानांनी आवाहन केल्याने समितीची औपचारिकता टाळून ई-कचरा जमा करण्यात आला. केंद्र सरकारमधील विविध मंत्रालयांमध्ये दशकभरापासून पडून असलेले संगणक गोळा करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ई-कचऱ्याची किंमत कोटय़वधीच्या घरात आहे. अनेक फाइल्सही धूळ खात पडून होत्या. या फाइल्सची कमी महत्त्वाच्या, महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या अशी विभागणी करण्यात आली. अतिमहत्त्वाच्या फाइल्सची ई-नोंदणी करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत अभियानाचा हेतू म्हणजे केवळ कचऱ्याची विल्हेवाट लावणे नव्हे; तर कार्यालयांनी कामकाजात शिस्त आणणे असा असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. देशभरातील ३१ लाख सरकारी कर्मचारी सुटीच्या दिवशी कार्यालयात आल्याचे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा झाल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला.
नऊ जणांची साखळी!
स्वच्छ भारत अभियान यशस्वी होण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी त्यात सहभागी होण्याची गरज आहे, हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी ‘नऊ जणांची साखळी’ करण्याची योजना घोषित केली. प्रत्येकाने किमान नऊ जणांना या योजनेत सहभागी करून घ्यावे आणि त्यातील प्रत्येकाने पुन्हा आणखी नऊ जणांना जोडावे. असे करीत देशातील प्रत्येक नागरिकाला या अभियानात सहभागी करून घ्यावे, अशी ही योजना आहे. पंतप्रधानांनी सचिन तेंडुलकर, उद्योगपती अनिल अंबानी, योगगुरू बाबा रामदेव, काँग्रेस नेते शशी थरूर, सलमान खान, प्रियांका चोप्रा, कमल हसन, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा आणि ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील सर्व कलाकार यांना या योजनेत समाविष्ट करून घेतले.
अंमलबजावणी महत्त्वाची – काँग्रेसची प्रतिक्रिया
‘स्वच्छ भारत अभियाना’ला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. ही कल्पना चांगलीच आहे. मुद्दा फक्त या अभियानाची अंमलबजावणी कशी होते हा आहे. अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्यास हे अभियान केवळ छायाचित्रांपुरते, दिखाऊ होऊन बसेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली. फोटोचा देखावा केल्याने, वर्षांतून एकदा मंत्र्यांनी झाडू हातात घेतल्याने स्वच्छता निर्माण होणार नाही. महात्मा गांधी संडास स्वत: स्वच्छ करीत असत आणि हे काम ते वर्षांतून एकदा नव्हे तर रोज करीत असत, हे या संदर्भात लक्षात ठेवावयास हवे. सरकारला स्वच्छ भारताचे स्वप्न मूर्त स्वरूपात, प्रत्यक्षात आणायचे असेल तर मलनि:सारण आणि कचऱ्याच्या विल्हेवाटीची योग्य सोयही उपलब्ध करून द्यायला हवी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी केली.  
पंतप्रधानांच्या अचानक भेटीने धावपळ
राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींना आदरांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान वाल्मीकी वस्तीकडे निघाले होते. परंतु वाटेत त्यांनी अचानक आपला वाहनांचा ताफा मंदिर मार्ग पोलीस ठाण्याकडे वळवला. सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता किती आहे हे तपासण्यासाठी त्यांनी या पोलीस ठाण्याची निवड केली. या पोलीस ठाण्याच्या आवाराची त्यांनी पाहणी केली आणि तेथील पार्किंगच्या जागेत साचलेला कचरा स्वत: झाडू हाती घेऊन स्वच्छ केला. येथे येताना पाहून पोलीस अधिकारी तसेच स्वत: मोदींसमवेतचे अधिकारीसुद्धा आश्चर्यचकित झाले. मोदी सुमारे १५ मिनिटे पोलीस ठाण्यात होते. या ठाण्यातील बहुतांशी पोलीस आणि अधिकारी राजघाटावर तैनात होते. परंतु जे पोलीस उपस्थित होते त्यांच्याशी मोदी यांनी संवाद साधत त्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून दिले. परिसरात फिरत असताना त्यांना एका ठिकाणी कचरा आढळल्यावर स्वत: झाडू हाती घेत तो झाडून काढला.
प्रत्येकाने वर्षभरात १०० तास द्यावेत -राष्ट्रपती
स्वच्छ भारत अभियानात राष्ट्रपती प्रणव मुखर्जीसुद्धा सहभागी झाले. या मोहिमेसाठी प्रत्येक भारतीयाने आठवडय़ात दोन तास अथवा वर्षभरात १०० तास द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. आपला परिसर स्वच्छ ठेवणे हा देशाची सेवा करण्याचा उत्तम मार्ग आहे. सरकारी प्रयत्नांव्यतिरिक्त प्रत्येकाने या मोहिमेतील आपला वाटा उचलावा, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.
 

Story img Loader