देशभरात कोरोना लसीकरणावर भर दिला जातोय. त्यासाठी १०० टक्के लसीकरणाचं उद्दिष्टही ठेवलं जात आहे. आता देशातील एका जिल्ह्यानं १८ वर्षावरील १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती दिलीय. त्यामुळे अशी कामगिरी करणारा हा जिल्हा देशातील पहिला जिल्हा ठरलाय. किनौर असं या हिमाचल प्रदेशमधील जिल्ह्याचं नाव आहे. जिल्हा प्रशासनाने बुधवारी (१३ ऑक्टोबर) याबाबत माहिती दिली. हा टप्पा गाठणारा हा पहिला जिल्हा ठरला आहे.
किनौर जिल्ह्यात १८ वर्षांवरील लोकसंख्या ६० हजार ३०५ इतकी आहे. या सर्वांना जिल्हा प्रशासनाने कोरोना विरोधी लसीचे दोन डोस दिले आहेत. विशेष म्हणजे या जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी १०० टक्के लसीकरणाचा टप्पा गाठण्यासाठी अगदी डोंगर दऱ्या पार करुन मोहीम राबवली. या जिल्ह्यात डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पशूपालन करणारा समूह राहतो. त्यांची संख्या मोठी होती. त्यामुळेच ते राहत असलेल्या ठिकाणी जाऊन लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
हिमाचल प्रदेशमध्ये ऑगस्टमध्ये पहिल्या डोसचं १०० टक्के लसीकरण
हिमाचल प्रदेश सरकारने दिलेल्या ऑगस्टमध्ये पहिल्या डोसचं १०० टक्के लसीकरण झाल्याची घोषणा केली होती. यात १८ वर्षांवरील सर्वांचा समावेश आहे.
दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत; रिकव्हरी रेट ९८ टक्क्यांवर
देशात गेल्या २४ तासांत १८ हजार ९८७ करोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून २४६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १९ हजार ८०८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. या नवीन बाधितांसह एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ४० लाख २० हजार ७३०वर पोहोचली आहे. आतापर्यंत ३ कोटी ३३ लाख ६२ हजार ७०९ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ४ लाख ५१ हजार ४३५ जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
देशात सध्या २ लाख ६ हजार ५८६ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९८.०७ टक्के आहे. विकली पॉझिटिव्हीटी रेट १.४४ टक्के असून डेली पॉझिटिव्हीटी रेट १.४६ टक्के आहे. हा दर गेल्या ४५ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.
हेही वाचा : आता ७-११ वर्षे वयोगटातील मुलांचीही लसीकरण चाचणी, ‘सीरम’ला केंद्राची परवानगी
दरम्यान गेल्या २४ तासांत ३५ लाख ६६ हजार ३४७ जणांचं लसीकरण करण्यात आलंय. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ९६ कोटी ८२ लाख २० हजार ९९७ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय.