रेल्वे म्हटले की त्याला त्याला इंजिन असणार असे आपल्याला अगदी सहज वाटून जाते. पण इंजिनशिवायची रेल्वे तुम्ही कधी पाहिलीये? नाही ना? पण आता इंजिनशिवाय रेल्वे तुम्हाला भारतात दिसू शकते. याचे कारण म्हणजे भारताची पहिलीच इंजिन नसलेली ट्रेन रुळावर परिक्षणासाठी येणार आहे. ही ट्रेन शताब्दी एक्सप्रेसची जागा घेणार आहे, यात वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानामुळे ही ट्रेन नेहमीच्या ट्रेनपेक्षा जास्त वेगाने धावणार आहे. एकूण १६ डब्यांच्या या ट्रेनचे नाव ‘ट्रेन १८’ असे असते. २९ ऑक्टोबरला ही ट्रेन परिक्षणासाठी जाणार आहे. त्यानंतर सर्व नियमांतून पास झाल्यावर ही ट्रेन प्रत्यक्ष रुळावर येईल. या ट्रेनला चेन्नईतल्या इंटिग्रल कोच फॅक्ट्री (आयसीएफ) मध्ये १८ महिन्यांमध्ये तयार करण्यात आलं आहं. या ट्रेनच्या प्रतिकृतीसाठी १०० कोटी रुपयांचा खर्च आला असून भविष्यात त्याच्या निर्मितीचा खर्च कमी होईल असा अंदाज आहे.
या ट्रेनचं अनावरण २९ ऑक्टोबरला अनावरण झाल्यानंतर रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायजेशन (आरडीएसओ)कडे ही ट्रेन पुढच्या परिक्षणासाठी पाठवण्यात येईल. या ट्रेनच्या मध्ये २ एक्झिक्युटीव कंपार्टमेंट असतील. प्रत्येकात ५२ जागा असतील, तर सामान्य डब्यात ७८ जागा असतील अशी माहिती आयसीएफचे महाप्रबंधक सुधांशू मणी यांनी दिली आहे. शताब्दी ट्रेनचा वेग १३० किमी प्रती तास आहे. तर ही ट्रेन १६० किमी प्रती तासाच्या वेगानं धावेल. या ट्रेनमध्ये जीपीएस आधारित प्रवासी सूचना प्रणाली, वेगळ्या प्रकारचे लाईट, ऑटोमेटिक दरवाजे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शताब्दी ट्रेन १९८८ मध्ये सुरु करण्यात आली होती. सध्या ही ट्रेन देशातल्या मेट्रो शहरांना दुसऱ्या प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या २० रेल्वे मार्गांवर सुरु आहे.