केवळ महिलांसाठी असलेले पहिले विद्यापीठ उत्तर प्रदेशातील रायबरेलीत सुरु होणार आहे. केंद्राने त्याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली. इंदिरा गांधी यांचे नाव या विद्यापीठाला दिले जाणार आहे. त्याच बरोबर रायबरेलीत स्वतंत्र नागरी उड्डयण विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा हा मतदारसंघ आहे.
संशोधन आणि उच्च शिक्षणावर केंद्रीत हे महिला विद्यापीठ असेल. त्यासाठी १२ व्या योजनेत पाचशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात इंदिरा गांधी राष्ट्रीय महिला विद्यापीठाच्या नावे विधेयक सादर केले जाईल असे माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी सांगितले. रायबरेली मतदारसंघ गांधी घराण्याचा मानला जातो.यापूर्वी इंदिरा गांधींनी अनेक वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.  महिलांच्या सर्वागिण विकासासाठी हे विद्यापीठ मोलाचे योगदान देईल अशी अपेक्षा तिवारी यांनी व्यक्त केली.
 या बरोबरच रायबरेलीत स्वतंत्र नागरी उड्डयण विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. राजीव गांधी यांचे नाव या विद्यापीठाला दिले जाणार आहे. यामध्ये वैमानिक, अभियंते इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. संशोधन आणि प्रशिक्षणात हे विद्यापीठ योगदान देणार आहे. फुरसतगंज येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डयन अकादमीतील २६ एकर जागा त्यासाठी निश्चिीत केली आहे. त्यासाठी २०२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी ८० कोटी रुपयांना १२ व्या योजनेत मंजूरी देण्यात आली आहे. याबाबतच्या विधेयकाला अंतिम स्वरुप देण्यात येत असून ते संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे.

उत्पन्न मर्यादा वाढवली
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी केंद्राने शिष्यवृत्तीसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा दोन लाखांवरून साडे चार लाख रुपये इतकी केली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने या निर्णयाला मान्यता दिली. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना देशातील प्रमुख संस्थांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने २००७-०८ मध्ये ही शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली.