हुबेहुब बुलेट ट्रेनसारखी दिसणारी संपूर्ण भारतीय बनावटीची पहिल्या इंजिनविरहित रेल्वेची लवकरच चाचणी घेण्यात येणार आहे. ही रेल्वे स्वयंचलित असून तिला चालवण्यासाठी इंजिनाची गरज नाही. त्याचबरोबर लोकांना यात अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
First Made in India train set ready for trial run https://t.co/1KvGzWIx1S pic.twitter.com/ZhOK0yQIag
— TOIChennai (@TOIChennai) October 23, 2018
या खास रेल्वेचे डिझाईन आणि निर्मिती करणारे इंटिग्रल कोच फॅक्टरीचे सरव्यवस्थापक सुधांशू मनी म्हणाले, या रेल्वेचे ट्रेन १८ म्हणून नामकरण करण्यात आले असून त्यासाठी १०० कोटी रुपये खर्च आला आहे. यानंतर याच प्रकारची दुसरी रेल्वे येत्या मार्च रोजी तयार होणार आहे. त्यावेळी रेल्वेचा निर्मिती खर्च आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
दिल्ली-भोपाळ, चेन्नई-बेंगळुरु आणि मुंबई-अहमदाबाद यांसारख्या कमी अंतरावरील एका दिवसांत जलद प्रवास होईल अशा मार्गासाठी ही रेल्वे तयार करण्यात आली आहे. या रेल्वेच्या एका डब्यात १६ कोचसहित आधुनिक सुविधा उपलब्ध असतील. या रेल्वेमुळे नेहमीच्या रेल्वेपेक्षा १० ते १५ टक्के वेळ वाचवता येऊ शकेल. या रेल्वेला उत्कृष्ट वेग आहे. सर्वसाधारण रेल्वेपेक्षा ५० टक्के जास्त ताकद या रेल्वेमध्ये असून यात स्मार्ट ब्रेकिंग सिस्टिमही बसवण्यात आली आहे.
ही रेल्वे म्हणजे मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेला एक सर्वाधिक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ही रेल्वे पूर्णपणे भारतातच बनवण्यात आली आहे. या रेल्वेच्या निर्मितीतून परदेशातून आयातीच्या तुलनेत कमी खर्चात बनवण्यात आली आहे. कारण, याच प्रकारच्या दर्जाच्या सुविधा असणारी एक ट्रेन आयात करण्यासाठी १७० कोटी रुपये खर्च येतो. मात्र, भारतात या रेल्वेच्या निर्मितीसाठी १०० कोटी रुपये खर्च आला आहे. भारतातील नामांकित खासगी कंपनीने ही रेल्वे ३६ महिन्यांत तयार केली आहे.
या रेल्वेच्या मध्यभागी एक्झिक्युटिव्ह क्लासचे कोच बसवण्यात आले आहेत. हे कोच ३६० डिग्रीमध्ये फिरु शकतात. या कोचेसमुळे प्रवाशांना रेल्वेबाहेरील दृश्ये थेट समोरच्या दिशेने पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. हे कोच स्पेनवरुन खास विमानाने मागवण्यात आले आहेत. त्याचबरोबर ब्रेकिंग सिस्टिम आणि ट्रान्सफॉर्मरपासून या बाबी यातील महत्वाच्या बाबी आहेत.
पहिल्यांदाच प्रवाशांना या रेल्वेच्या ड्रायव्हरच्या केबिनला नॉक करता येणार आहे. तसेच त्यांच्या केबिनमधील जागा पाहू शकतील. या रेल्वेच्या वेगाची सध्या मोरादाबाद-बरेली आणि कोटा-सवाई माधवपूर या मार्गावर पुढच्या महिन्यात चाचणी होणार आहे.