आणीबाणीच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांच्यावर तिखट शब्दात टीका केली होती. आणीबाणीच्या काळात ते तुरुंगातही गेले. मात्र, त्याच वाजपेयींनी निवडणुकीनंतर मनाचा मोठेपणा दाखवला होता. आणीबाणीच्या काळात आमच्यावर अन्याय झाला. पण आम्ही असं करणार नाही. तुम्हाला कोणतीही अडचण आली तर आम्हाला संकोच न करता सांगा, असे वाजपेयींनी इंदिरा गांधी यांना सांगितले होते.
अटलबिहारी वाजपेयींबरोबर सावलीसारखे वावरणारे शिवशंकर पारीख यांच्याशी विनय सहस्त्रबुद्धे यांनी संवाद साधला होता. डिसेंबर २०१२ मध्ये ही मुलाखत ‘लोकसत्ता’च्या रविवार विशेषमध्ये छापून आली होती. पारीख यांनी पक्षात आणि पक्षाबाहेरही विविध नेत्यांशी वाजपेयी यांचे स्नेहाच्या किंवा तणावाच्या संबंधांबद्दल उजाळा दिला होता. यात त्यांनी इंदिरा गांधींबद्दलचा तो किस्साही सांगितला.
वाचा सविस्तर: शिवशंकर पारीख यांनी वाजपेयींबद्दल काय सांगितले होते
पारीख म्हणतात, आणीबाणीनंतर इंदिराजींचा पराभव झाला आणि अटलजी परराष्ट्रमंत्री झाले. तिसऱ्याच दिवशी अटलजी इंदिरा गांधींना भेटायला गेले. ते म्हणाले, ‘‘इमर्जन्सीमें ज्यादतीया हुवी, मगर मैं आपको बताने आया हूँ कि हम कभी कोई ज्यादती नहीं करेंगे। आपको किसी तरह का कोई कष्ट हो तो बे-झिझक हमें बताए।’. ही भेट संपली त्यावेळी इंदिराजींच्या डोळ्यातही पाणी आले होते, असे त्यांनी सांगितले.