पीटीआय, बंगळूरु : ISRO Aditya L1 Solar Mission देशाच्या पहिल्या सौर मोहिमेतील ‘आदित्य एल १’ उपग्रहाची पृथ्वीच्या कक्षेशी संबंधित पहिली प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) रविवारी जाहीर केले. ही प्रक्रिया येथे असलेल्या ‘इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क’द्वारे (आयएसटीआरएसी-इस्ट्रॅक) पार पडली. हा उपग्रह अगदी सुस्थितीत असून योग्यरित्या काम करत असल्याचेही ‘इस्रो’ने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इस्रो’ने ‘एक्स’वर प्रसृत केलेल्या तपशीलात नमूद केले आहे, की कक्षेसंबंधित पुढील प्रक्रिया ५ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय स्थानिक वेळेनुसार पहाटे तीन वाजता नियोजित केली आहे. पहिली पृथ्वी कक्षा परिभ्रमण मोहीम (ईबीएन#1) बंगळुरूच्या ‘आयएसटीआरएसी’येथून यशस्वीरित्या पार पडली. या उपग्रहाने प्राप्त केलेली नवीन कक्षा २४५ किलोमीटर  ७ २२,४५९ किमी आहे. ‘आदित्य एल १’ला शनिवारी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले गेले. ‘आदित्य-एल १’ ही अवकाशीय सौर वेधशाळा असून, ती सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणार आहे. हा उपग्रह सूर्यावर उतरणार नाही किंवा त्याच्या जवळही जाणार नाही.

हेही वाचा >>> कामगिरी फत्ते, ‘प्रज्ञान’ निद्रावस्थेत!; ‘चंद्रयान -३’बद्दल इस्रोकडून माहिती

लक्ष्यपूर्ती १२५ दिवसांनी

सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षण समतोल बिंदूंपैकी एक बिंदू- ‘लँगरेंज पॉइंट १’ (एल-१) वर हे यान प्रस्थापित करण्यात येईल. तेथपर्यंत म्हणजे पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर सूर्याच्या दिशेने हे यान १२५ दिवसांनी पोहोचणार आहे. हे अंतर पृथ्वी-सूर्यातील एकूण अंतराच्या सुमारे एक टक्केच असले तरीही ‘एल-१’ हा सूर्याच्या तुलनेने सर्वात जवळचा बिंदू मानला जातो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First procedure of aditya l1 successful next action related to earth orbit tomorrow ysh
First published on: 04-09-2023 at 00:09 IST