Chennai Coromandel Express Accident : ओडिशातील बहनगा बाजार स्थानकात गेल्या दोन शतकातील सर्वांत भीषण अपघतात घडला. तीन रुळांवरून धावणाऱ्या तीन ट्रेन एकाचवेळी एकमेकांवर धडकल्या आणि जवळपास २८८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर, तब्बल हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की ट्रेनचे डबे रुळांसकट बाजूला फेकले गेले. त्यामुळे मोठा कल्लोळ झाला. रेल्वे स्थानकाच्या दिशेने मोठा आवाज आल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी लागलीच स्थानकाच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी जे दृश्य समोर पाहिलं ते त्यांच्यासाठी धक्कादायकच होतं. परंतु, अशा संकटाच्या काळात पळून न जाता, काही नागरिकांनी जीवतोड मेहनत करून अनेक नागरिकांचे प्राण वाचवले. कोणी फुकट पाणी आणि खाण्याची सोय केली, तर कोणी लहान मुलांची काळजी घेतली. तर कोणी मोफत इंजेक्शन आणि औषधे वाटली. याच देवदुतांविषयी जाणून घेऊयात.
अपघात झाला त्या स्थळावरून अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या २५ वर्षीय सौभाग्य सारंगीला अचानक मोठा आवाज आला. त्याचं स्वतः मेडिकल दुकान आहे. आवाज ऐकताच त्याने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. “मला मोठा आवाज ऐकू आल्याने मी बाहेर धावलो. मोठा अपघात झाल्याने लोकांना वाचवून माझ्या दुकानाजवळ उभे केले जात होते. मी त्यांना टिटॅनसची इंजेक्शन्स आणि वेदना कमी करणारी औषधे द्यायला सुरुवात केली. माझे शेजारीही त्यात सामील झाले. मी बँडेज आणि इतर औषधेही दिली. शेवटी मी पहाटे ४ वाजता घरी गेलो”, असं सारंगीने सांगितलं. त्याने मदत केलेल्या औषधांची किंमत जवळपास आठ हजार रुपये होती. परंतु, त्याने एक रुपयाही जखमींकडून घेतला नाही. ‘मी माणूस नाही का?’ असा प्रश्नही त्याने यावेळी विचारला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
हेही वाचा >> अपघाताची सीबीआय चौकशी; रेल्वे मंडळाची शिफारस, सुरक्षा यंत्रणेत फेरफार केल्याचा संशय
सारगीचं मेडिकल ज्या इमारतीत आहे, त्याच इमारतीत एक निवृत्त सरकारी कर्मचारी राहतात. निलंबर बेहेरा (६४) असं त्यांचं नाव. “आम्ही एक मोठा आवाज ऐकला आणि बाहेर धावलो. आम्ही जे पाहिले त्याचे वर्णन करू शकत नाही. लोक मदतीसाठी ओरडत होते. त्यामुळे तात्काळ आम्ही मदतीला धावलो”, असं बेहेरा यांनी सांगितलं. त्या अपघातातून सुखरूप वाचलेल्या ५० मुलांना बेहेरा यांनी आसरा दिला. १५-१५ वर्षांच्या मुलांना निवारा देऊन त्यांनी त्यांना खाऊ-पिऊ घातलं. ही मुलं पाटणाची होती. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ही मुलं आमच्या गच्चीवर होती. त्यानंतर, आम्ही त्यांना अधिकाऱ्यांकडे सोपवलं”, असं बेहेरा यांच्या पत्नी रिनामणी यांनी सांगितलं.
पायाला खोल जखमी लागली तरीही मदतकार्य केलं
दरम्यान, बेहेरा यांच्या मुलाची दोन मित्रही त्या ट्रेनमध्ये होती. या मित्रांचा फोन येताच चंदन कुमार तत्काळ घटनास्थळी गेला. चंदन कुमारच्या तत्काळ कृतीमुळे या दोघांचे प्राण वाचू शकले. एवढंच नव्हे तर त्याने तिथे अडकलेल्या अनेकांना बाहेर काढलं. बचावकार्य सुरू असताना माझ्याही पायाला खोल जखमी झाल्याचं चंदन कुमारने सांगितलं.
बालासोर अपघातातील जखमींच्या नातेवाईकांना फोन लावले
बेहेरा कुटुंबाच्या बाजूलाच राहणाऱ्या झुलन दास कुटुंबानेही या काळात माणुसकी जपली. त्यांनी जखमींना प्रथमोपचार दिले. तसंच, त्यांच्या १२ वर्षीय रिद्धिमान याने जखमींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यास मदत केली. “त्यापैकी बरेच जण आमच्या घराजवळ जमले होते. माझी आई जखमींना प्राथमिक उपचार देत होती… मी जखमींच्या नातेवाईकांना फोन केला… ते घाबरले होते”, रिद्धिमान म्हणाला.
घटनास्थळाहून ५० मीटर अंतरावर असलेल्या लक्ष्मी स्टोअर्सच्या मालकाने यावेळी मोलाची मदत केली. महेश गुप्ता (५८) यांचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांनी जखमींना पाणी आणि खायला दिले. बचावकार्य करण्याकरता सुरुवातीला त्यांनी दुकान बंद ठेवले. परंतु, नंतर त्यांनी पाणी आणि खायला देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत दुकान उघडे ठेवले होते, असं त्यांनी सांगितलं.
गुप्ता यांच्या दुकानापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या सौम्यरंजन लुलू (३३) यांनी देखील या काळात मदत केली. “लोक मदतीसाठी ओरडत होते. आम्ही लोखंडी रॉड घेतला आणि खिडकी फोडली. आतमध्ये अडकलेल्यांना आम्ही जितके शक्य तितके ओढून बाहेर काढले. त्यातले दोघे माझ्या खांद्यावर मरण पावले. मी त्यांना रस्त्यावर सोडून परत आलो”, असं त्याने सांगितलं.
ओडिशा रेल्वे अपघातात मृतदेह छिन्नविछिन्न पडले होते
“आम्ही पाण्याचे पाऊच घेतले आणि जखमी प्रवाशांवर टाकले. त्यांच्या आजूबाजूला छिन्नविछिन्न मृतदेह पडले होते”, असे दुसरे दुकान मालक हरिहर मोहंती यांनी सांगितलं. अपघात स्थळाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या कामरपूर गावात, प्रताप सिंग (४५) यांनी सांगितलं की, जखमींना घेऊन जाण्यासाठी ‘स्ट्रेचर’ बनवण्यासाठी त्यांनी रिकाम्या सिमेंटच्या पिशव्या हाताने शिवल्या. “मोठा आवाज ऐकून आम्ही घटनास्थळी धाव घेतली. लोक मदतीसाठी ओरडत होते. जखमींना घेऊन जाण्यासाठी आमच्याकडे स्ट्रेचर नव्हते, म्हणून आम्ही रिकाम्या सिमेंटच्या पिशव्या टाकल्या. मी माझ्या मित्राकडून गॅस कटर घेतला आणि डबा उघडण्याचा प्रयत्न केला”, असं सिंग यांनी सांगितलं.
ओडिशात बचाव पथके उशिरा आली
त्यांची शेजारी लिली हंसदा (२८) ही एक एक मजूर आहे. तिनेही बचाव कार्यात मदत केली. “आम्ही शक्य तितक्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. बरेच जण आधीच मरण पावले होते. अनेकांचे हात-पाय छिन्नविछिन्न झाले होते… आम्ही सकाळपर्यंत तिथे काम केले”, असं ती म्हणाली. “पोलीस आणि अधिकृत बचाव पथके खूप नंतर आली… माझे कपडे जखमींच्या रक्ताने लाल झाले होते”, असं भगबान हेमब्रम (३५) वर्षीय शेतकऱ्याने सांगितलं.