श्रीलंकेतील तामिळी नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्दय़ावर शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले. द्रमुक व अण्णा द्रमुक या पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या गोंधळात सलग तिसऱ्या दिवशी लोकसभेत अजिबात काम होऊ शकले नाहीत, तर राज्यसभेत अण्णाद्रमुकच्या सदस्यांनी सभापतींसमोरील माइकचीच मोडतोड केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपुष्टात आला असून महिन्याभराच्या सुट्टीनंतर २२ एप्रिलपासून दुसऱ्या टप्प्यातील कामकाज सुरू होईल.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत श्रीलंकेविरोधात कडक ठराव मंजूर करून घेण्यात भारताला अपयश आल्याच्या मुद्दय़ावर द्रमुक व अण्णाद्रमुकसह तामिळनाडूतील अन्य पक्षांच्या सदस्यांनी शुक्रवारी दोन्ही सभागृहांत गोंधळ सुरू केला. इटलीतील नौसैनिकांच्या मुद्दय़ावर केंद्रीय परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांना निवेदन करण्यासही या सदस्यांनी मज्जाव केला. अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा शेवटचा दिवस असल्याने सेबीसंदर्भातील विधेयकासह अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्याचे आव्हान सरकारसमोर होते. यासाठी सकाळी कामकाज सुरू होण्यापूर्वी संसदीय कार्यमंत्री कमलनाथ यांनी लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्याशी संवादही साधला. मात्र, गोंधळात ही विधेयके मंजूर होऊ शकली नाही. सेबीसंदर्भातील अध्यादेश ४ एप्रिल रोजी संपुष्टात येत असल्याने ते विधेयक शुक्रवारी मंजूर होणे अत्यावश्यक होते. मात्र दोनदा सभागृह तहकूब करूनही गोंधळ कमी न झाल्याने कोणत्याही कामकाजाविनाच लोकसभा सुट्टीसाठी तहकूब करण्यात आली.
दुसरीकडे राज्यसभेतही लंकेविरोधातील ठरावाचे पडसाद उमटले. कामकाज सुरू होता होताच द्रमुक व अण्णाद्रमुकच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने सभागृह काही काळ तहकूब करावे लागले. तर दुपारी अडीचच्या सुमारासही गोंधळ सुरू राहिल्याने कामकाज तहकूब झाले. दरम्यान, राज्यसभेत सभापतींच्या टेबलावरील चार माइकपैकी दोन माइकची अण्णाद्रमुकच्या सदस्यांनी मोडतोड केल्याने वातावरणातील तणाव आणखी वाढला. त्या वेळी पीठासीन अधिकारी असलेल्या रेणुका चौधरी यांनी कामकाज तहकूब करताना घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांकडे उद्देशून आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यामुळे या सदस्यांचा आणखी भडका उडाला. मात्र, अंबिका सोनी, जयराम रमेश व आर.पी.एन. सिंह या काँग्रेस नेत्यांनी द्रमुकच्या सदस्यांची समजूत काढल्याने तणाव निवळला. नंतर चौधरी यांनीही घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा