मागील काही दिवसांपासून गौतम अदाणी प्रकरणावरून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेससह इतर विरोधीपक्ष सत्ताधारी भाजपाविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी गौतम अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधकांनी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शुक्रवारी लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांत गदारोळ झाला.
भ्रष्टाचाराच्या आरोपांवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस नेत्यांनी भष्ट्राचाराचे आरोप करण्याआधी स्वत:चा चेहरा डेटॉलने धुवावा, असं प्रत्युत्तर निर्मला सितारमन यांनी दिलं. त्या लोकसभेत बोलत होत्या. शुक्रवारी काँग्रेस नेत्यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले, यानंतर निर्मला सितारमन यांनी संताप व्यक्त केला.
“भ्रष्टाचारावर बोलण्याआधी डेटॉलने तोंड धुवा. भ्रष्टाचारावर कोण बोलतंय? बघा…” असा उपरोधिक टोला सीतारामन यांनी लगावला. दरम्यान, त्यांनी व्हॅट (VAT) कमी न करणाऱ्या राज्यांवरही निशाणा साधला. लोकसभेला संबोधित करताना निर्मला सितारामन म्हणाल्या, गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने दोन वेळा इंधनावरील व्हॅट (VAT) कमी केला. पण काही राज्यांनी मात्र व्हॅट कमी केला नाही. हिमाचल प्रदेशात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर तिथे डिझेलवर व्हॅट का वाढवला? असा सवालही सितारामन यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांना विचारला.